अमरावती, 4 जून (हिं.स.) : अमरावती महापालिका द्वारे मान्सुनपुर्व तयारीचा अनुषंगाने पावसाळ्यात आपत्ती घडू नये यासाठी शहरातील १८ मोठे व लहान २२ नालेसफाई चे कामे व झोन स्तरावर असलेले कच्चे नाले / नाल्या सुद्धा साफ करण्याचे कामे माहे मार्च पासून सुरू करण्यात आली आहेत. काही ठिकाणी मनुष्यबळाद्वारे सुद्धा नाले सफाईची कामे सुरू आहेत, सद्यस्थितीत ८५% टक्के नाले सफाईचे काम पूर्ण झाले आहेत. मा.आयुक्त सचिन कलंत्रे, मा.अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त प्रशासन डॉ.मेघना वासनकर यांचे द्वारा नियमित नाले सफाईचे कामांची तपासणी सुरू आहेत व पाचही झोनचे सहाय्यक आयुक्त यांचे मार्फत सुद्धा नाले सफाईचे कामांचे स्थळ तपासणी सुरू आहे.
हवामान खात्याने राज्यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मनपाच्या सर्व यंत्रणांनी सज्ज असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्तीच्या काळात सर्व संबंधीत मनपा यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सांगितले. तसेच नालेसफाईची कामे पारदर्शक होण्याचे दृष्टीने व नागरिकांना याबाबतची संपूर्ण माहिती मिळण्याचे अनुषंगाने दैनंदिन नाले सफाईचे कामे मनपाचे वेबसाईटवर सुद्धा अपलोड करण्यात आली आहे, तसेच मा.आयुक्त सचिन कलंत्रे यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की, नाल्यांच्या पाण्याचा प्रवाहास अडचण निर्माण होणारे कचरा, जुने भंगार साहित्य टाकू नये. अमरावती महानगरपालिकेतर्फे नाले साफ सफाई झाल्यावरही बरेच हॉकर्स, व्यावसायीक व नागरिक नाल्यामध्ये कचरा टाकत आहे. सदर बाबींमुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होवून हानी होण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून नाल्यात कचरा टाकणा-यांवर अटकाव करणे अत्यंत महत्वाचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी