पुणे , 4 जून (हिं.स.)।अतिक्रमण कारवाईसाठी मागील आठवड्यापासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.आता गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईसह धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होत आले असून उद्या, गुरुवार (दि.५) पासून सिंहगड किल्ला खुला करण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिली.
याबाबत प्रांताधिकारी यशंवत माने म्हणाले, 'पर्यटकांना इजा होऊ नये अथवा कारवाईत अडथळा येऊ नये, म्हणून गडावर प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. आता सर्व काम झाले आहे. पाडण्यात आलेला राडारोडा उचलण्याचे काम बुधवारी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जूनपासून पर्यटकांना सिंहगडावर प्रवेश देण्यात येणार आहे. ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर येता यावे, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.'
सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. येथे आरसीसी, दगडी बांधकाम करण्यात आले होते तसेच पावसाळ्यात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे अतिक्रमण व दरडी हटविण्याचे काम करताना रस्ता मोकळा मिळावा, तसेच कोणत्याही पर्यटकांना इजा होऊ नये, यासाठी २९ मेपासून पर्यटकांना सिंहगडावर जाण्यास बंदी केली होती. वनविभागाने या काळात गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. जवळपास २० हजार स्क्वेअर फूट बेकायदा बांधकामे पाडण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode