चिपळूणमध्ये शनिवारी वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांची श्रद्धांजली सभा
रत्नागिरी, 4 जून, (हिं. स.) : वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांची श्रद्धांजली सभा येत्या शनिवारी, दि. ७ जून रोजी चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आली आहे. दिनकरशास्त्रींचे नुकतेच निधन झाले. गेली अनेक वर्षे ते चिपळूणमध्ये पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत होते आण
दिनकरशास्त्री फडके


रत्नागिरी, 4 जून, (हिं. स.) : वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांची श्रद्धांजली सभा येत्या शनिवारी, दि. ७ जून रोजी चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

दिनकरशास्त्रींचे नुकतेच निधन झाले. गेली अनेक वर्षे ते चिपळूणमध्ये पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत होते आणि वेदशास्त्रांचे शिक्षण देऊन त्यांनी अनेक विद्यार्थीही घडवले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके विद्यार्थी मंडळ आणि चिपळूणचा ब्राह्मण सहायक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी ६ वाजता चिपळूणला श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. चिपळूणच्या मध्यवर्ती एसटी बसस्थानकामागे ब्राह्मण सहायक संघात ही सभा होणार आहे.

वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांचा जन्म १९ जुलै १९४४ रोजी कुर्धे (ता. रत्नागिरी) येथे झाला. प्रसिद्ध वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र होत. लहानपणापासूनच त्यांनी वडिलांकडून वेदशास्त्रांचे शिक्षण घेतले आणि त्यात पारंगत झाले. घरी काही काळ त्यांनी रेशन दुकानही चालवले. पुढे वयाच्या तिशीत ते उद्योग-व्यवसाय करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडले. मग ते चिपळूणमध्ये स्थायिक झाले. तेथे सुरुवातीला त्यांनी कंत्राटे घेऊन रस्त्यांची, तसेच अन्य कामे करण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर अनेक वर्षे हॉटेल व्यवसायही केला. वेदशास्त्रांचे धडे लहानपणीच गिरवलेले असल्याने नंतर ते पुन्हा पौरोहित्याकडे वळले. करारी स्वभाव, तसेच शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या क्षेत्रात त्यांचे मोठे नाव झाले. आपले उद्योग-व्यवसाय सांभाळतानाच त्यांनी काही ज्येष्ठ व्यक्तींना पौरोहित्याचे धडे द्यायला सुरुवात केली होती. नंतर गेली काही वर्षे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना वेदशास्त्रांचे धडे दिले. त्यांनी आपल्या वडिलांचा केवळ पौरोहित्याचाच नव्हे, तर वेदशास्त्रसंपन्न विद्यार्थी घडवण्याचा वारसाही समर्थपणे चालवला. अगदी अखेरपर्यंत ते कार्यरत होते.

त्यांची कन्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. तिनेच वडिलांचे और्ध्वदेहिक करून वेगळा आदर्श घालून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande