अमरावती, 4 जून (हिं.स.) : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपुरकडे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्याकरिता जाणाऱ्या माता रुख्मिणीच्या पालखीचे अंबानगरीत बियाणी चौकात माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर तसेच खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे या मंगलमय सोहळ्याकरिता सर्वच धर्मातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हा स्वागत सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरला. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुख्मिणी मातेची पालखी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे होणाऱ्या आषाढी सोहळ्याकरिता जाण्याची ४३१ वर्षाची परंपरा आहे. श्रीक्षेत्र पंढरपुरच्या धर्तीवरच रुख्मिणी मातेचेही शासकीय पुजन व्हावे व श्रीक्षेत्र पंढरपुर येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रमाणेच रुख्मिणी मातेच्या पालखीलाही मानाचे स्थान मिळावे यासाठी माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी भगिरथ प्रयत्न केले होते. त्यानुसार आता श्रीक्षेत्र पंढरपुर येथे रुख्मिणी मातेचे शासकीय पुजन व सोबतच या पालखीला पंढरपुर येथे मानाची पालखी असा दुग्धशर्करा योग घडून आला आहे. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून निघाल्यानंतर अमरावती शहरात आगमन होताच स्थानिक बियाणी चौकात या पालखीचे स्वागत करण्याची परंपरा माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सुरु केली. त्यानुसारच या पालखीचे उत्स्फूर्त अन् जंगी स्वागत करण्यात आले. कलर बॉक्स बियाणी चौकात भक्तीरसाला उधान बियाणी चौकात सायं ७ वा. रुख्मिणी मातेच्या पालखीचे आगमन होताच माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते व उपस्थित असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे जल्लोष आणि भक्ती भावात स्वागत करण्यात आले. रुख्मिणी मातेची पालखी आणि भक्तीरसात तल्लीन झालेले वारकरी सोबत टाळ मृदंग आणि मुखात विठ्ठलाचे नाम असा मंगलमय सोहळा पार पडला. हा प्रसंग म्हणजे उपस्थित भाविकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. माजी आमदार ठाकूर यांनी धरला फुगडीचा फेर पालखीचे बियाणी चौकात आगमन होताच पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसोबत माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेर धरला. त्यानंतर आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेतली अन् त्यानंतर वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी