रत्नागिरी, 4 जून, (हिं. स.) : चांगले काम करणाऱ्या पत्रकाराला दिल्लीत नेहमीच सन्मान आहे. बातमीदारीसाठी पातळी घसरवणार असू , तर पत्रकाराला आणि पत्रकारितेला कधी सन्मान मिळणार नाही, असे मत अभिजित ब्रह्मनाथकर यांनी मांडले.
विभागीय कोकण माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कोकण विभागातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेत 'दिल्लीतील पत्रकारिता' या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल उपस्थित होते.
श्री. ब्रह्मनाथकर यांनी त्यांच्या दिल्ली वास्तव्यातील पत्रकारितेतील अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, घडामोडीच्या वातावरणातील कुठलीही व्यक्ती बातमी देईल, हा मंत्र दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील पत्रकार मित्राने दिला. दिल्लीने अनेक पत्रकार पाहिले. दिल्लीतून बातमी आली की, सर्वत्र ती चर्चिली जाते. पत्रकाराला स्टारडम मिळत नाही. बऱ्याच वेळा पत्रकारांकडून कधीकधी नेता बातमी मिळवतो आणि राजकारण करतो हे सांगून, तीन नाराज खासदारांची बातमी पत्रकारांकडून मिळवून त्यांना सत्तेत आणल्याचा प्रसंग त्यांनी सांगितला.
कधीकधी राजकीय लोक बातमी पेरायचे. तर कोणी दोन ओळी बोलायचे त्याची बातमी होऊन जायची. मी वर्तमानात राहायला शिकलो. सध्याच्या यू ट्यूब, व्हॉटस ॲपच्या माध्यमातून पत्रकारिता सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात काल्पनिक पत्रकार, काल्पनिक निवेदकाने बातमी दिल्यास नवल वाटायला नको, असेही ते म्हणाले.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांच्या मार्गदर्शनाचा समारोप झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी