तेहरान , 1 जुलै (हिं.स.) : इराण आणि इस्त्राईलमध्ये युद्धविराम झाला असला तरी, इराणला अजूनही हेरगिरीचा धोका जाणवत आहे. यमुळे इराणने एक नवा फतवा जारी केला आहे. यानुसार, जर देशात कोणीही इलॉन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवेचा वापर केला, तर त्याला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली जाईल.तसेच त्याला दंड भरावा लागेल आणि तुरुंगातही जावे लागू शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, इलॉन मस्कच्या इंटरनेट कंपनी स्टारलिंकवर बंदी घालण्यासाठी इराणने एक नवा कायदा बनवला आहे. यात स्टारलिंक वापरणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यासोबतच, या कायद्यात हेरगिरीसाठीही शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय, या कायद्यात अमेरिका आणि इस्त्राईलसारख्या देशांसाठी हेरगिरी करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचीही तरतूद आहे. सायबर हल्ले, ड्रोन आणि इतर हानिकारक शस्त्रांचा वापर, परदेशी गुप्तचर संस्थांकडून निधी स्वीकारणे यांसारख्या कृत्यांसाठीही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
अलीकडेच इराणच्या संसदेने अमेरिकन कंपनी स्टारलिंकच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यासाठी मतदान केले. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. हेरगिरीचे नियम अधिक कडक करण्यासाठी इराणने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. इराणचे मत आहे की, इंटरनेट ब्लॅकआउट दरम्यान, स्टारलिंक डिजिटल लाईफलाईन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकते, ज्यामुळे पश्चिमेकडील देशांशी त्यांचे माहिती तंत्रज्ञान विकसित होऊन तेहरानच्या चिंता वाढू शकतात.
इस्त्राईलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी इलॉन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'बीम चालू आहे' असा संदेश पोस्ट केला होता. याचा सरळ अर्थ असा होता की, इराणने इंटरनेट ब्लॅकआउट केला असला तरी, स्टारलिंकचे सॅटेलाईट इंटरनेट सुरू होते. तेहरानने इस्त्राईलच्या हल्ल्यांनंतर लगेचच डिजिटल संप्रेषण खंडित केले होते. असे असूनही स्टारलिंकचे इंटरनेट सुरू राहिल्याने इराणची ही बंदी कुचकामी ठरली.
--------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode