अकोला, 14 जुलै (हिं.स.)।शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक होत आज अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यलयात ठिय्या आंदोलन केलं आहे. मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी डि.बी कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे असे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची नावे असल्याचा आरोप देशमुख यांचा आहे. दरम्यान, या दोघांनाही पदावरून बडतर्फ करण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार नितीन देशमुख यांच ठिय्या आंदोलन केलं.
दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती, मात्र या संपूर्ण प्रकारणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असावे, कारण, असे आरोपी असलेले अधिकारीच सांगत असल्याचं देशमुख म्हणाले. अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता आज एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यात ठिय्या आंदोलन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटवर असलेल्या एका महिलेला पगार काढून देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर अद्यापही निलंबनाची कारवाई झाली नसल्याने आमदार नितीन देशमुख यांनी अकोला येथील जीवन प्राधिकरणच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलन पुकारला आहेय. या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी साठी आपण पत्र दिलं असतानाही लक्षवेधी लावण्यात आली नसून विधानसभा अध्यक्ष कुंभकरण झोपेत असल्याची टीका त्यांनी केली आहे. विरोधकांनी लावलेली लक्षवेधी सभागृहात घेण्यात येत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. तर पीडित महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्यावर नितीन देशमुख सध्या ठाम आहेत.
--------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे