छत्रपती संभाजीनगर, 31 जुलै (हिं.स.)। भारतीय टपाल विभागाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली (IT 2.0) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये सोमवार दि.४ ऑगस्टपासून कार्यान्वित होणार आहे. तसेच या प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी, शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी नियोजित देखभाल कार्य केले जाणार असल्याने छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील कोणत्याही डाक कार्यालयात टपाल व्यवहार सेवा उपलब्ध होणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे. ग्राहकांनी दि.२ ऑगस्ट रोजी असलेल्या सेवा बंद बाबत सहकार्य करावे व आपल्या टपाल व्यवहारांचे नियोजन करावे. प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली (IT 2.0) संदर्भात माहिती देण्यात आली की, या प्रणालीचा उद्देश ग्राहकांना अधिक जलद, सुलभ व कार्यक्षम सेवा पुरविणे असून, ही प्रणाली भविष्यातील गरजांनुसार डिजिटली सक्षम व स्मार्ट सेवा देईल. ग्राहकाभिमुख दृष्टिकोनातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या माध्यमातून टपाल सेवा अधिक पारदर्शक, वेगवान व आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis