चंद्रपूर : २०२६ च्या व्याघ्रगणनेच्या तयारीस प्रारंभ
चंद्रपूर, 3 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांच्या १९ व्याघ्र प्रकल्पांतील २०२६ च्या व्याघ्रगणनेच्या तयारीस प्रारंभ झाला आहे. मध्य भारतीय व्याघ्र क्षेत्रातील क्षेत्र संचालकांची दोन दिवसीय प्रादेशिक बैठक चंद्रपूर ये
संग्रहित


चंद्रपूर, 3 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांच्या १९ व्याघ्र प्रकल्पांतील २०२६ च्या व्याघ्रगणनेच्या तयारीस प्रारंभ झाला आहे.

मध्य भारतीय व्याघ्र क्षेत्रातील क्षेत्र संचालकांची दोन दिवसीय प्रादेशिक बैठक चंद्रपूर येथील चंद्रपूर वन अकादमीमध्ये पार पडली. ही बैठक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांतील १९ व्याघ्र प्रकल्पांचे वरिष्ठ वन अधिकारी या दोन दिवसीय परिषदेत सहभागी झाले होते. त्यावेळी २०२६ च्या व्याघ्रगणनेवर तयारीवर मंथन झाले. व्याघ्र संवर्धनातील आव्हाने, व्यवस्थापनातील प्रभावी उपाययोजना आणि व्याघ्र अधिवास टिकवण्यासाठी व सुधारण्यासाठी या बैठकीत सखोल चर्चा झाली.

यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अतिरिक्त महासंचालक (प्रोजेक्ट टायगर) व सदस्य सचिव डॉ. गोबिंद सागर भारद्वाज, महानिरीक्षक (वन) डॉ. संजयन कुमार, सदस्य राहुल भटनागर व मध्य भारत क्षेत्रचे सहायक महानिरीक्षक (वन) नंदकिशोर काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. गोबिंद सागर भारद्वाज यांनी दीर्घकालीन अधिवास सुधार, आक्रमक वनस्पती नियंत्रण, शाश्वत कुरण विकास आणि समुदाय-समावेशक उपाययोजनांद्वारे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यावर विशेष भर दिला. क्षेत्रीय पातळीवर विकेंद्रीत अंमलबजावणीस प्रोत्साहन देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

तांत्रिक सत्रांमध्ये विविध व्याघ्र प्रकल्पांनी डेटा सादर केला. अखिल भारतीय व्याघ्र गणना २०२६ ची तयारी, टप्पा ४ अंतर्गत ‘मॉनिटरिंग प्रोटोकॉल्स’ची अंमलबजावणी, व्याघ्र मृत्यू अहवालांची स्थिती, आणि व्याघ्र संवर्धन आराखड्यांची प्रगती यावर चर्चा झाली. स्पर्श पोर्टलद्वारे वार्षिक कार्ययोजना सादर करणे, स्वेच्छेने होणारे व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन, आणि व्यवस्थापन कार्यक्षमता मूल्यमापन यावरही विचारमंथन झाले.कुरण व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती- प्रतिनिधींना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष कुरण व्यवस्थापन व अधिवास सुधारणेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.१९ व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक व उपसंचालक यांनी आपले अनुभव सादर केले. त्यांनी स्थानिक आव्हाने, नवकल्पना आणि अधिवास-विशिष्ट उपाययोजना यांची माहिती दिली. या सत्रामुळे परस्पर ज्ञानवृद्धी झाली आणि अनुकूल व्यवस्थापनासाठी यशस्वी प्रारूप समोर आले. काही व्याघ्र प्रकल्पांनी तण वर्गीय वनस्पती नियंत्रण व कुरण व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande