धुळे, 3 जुलै (हिं.स.)जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, धुळे आणि ‘लेंड अ हँड इंडिया’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी व स्तुत्य उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अंतर्गत सुरू असलेल्या द्विलक्षी अभ्यासक्रम व उच्च माध्यमिक व्यवसायिक अभ्यासक्रमातील 11 वीच्या विद्यार्थ्यांनी 80 तासांची व्यावसायिक इंटर्नशिप पूर्ण केल्याबद्दल जिल्ह्यातील 7 शाळेतील 109 विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा, धुळे येथे संपन्न कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अपर्णा कुलकर्णी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे वरिष्ठ अधिव्याख्याता जयप्रकाश पाटील, कमलाबाई कन्या शाळा उपप्राचार्य सौ. उषा नाईक, जिल्हा समन्वयक, लेंड ॲ हँड इंडिया प्रकाश पाटील, तिरुपती एज्युकेशन संस्था,धुळे प्राचार्य विजयसिंग सिसोदिया आदी मान्यवर उपस्थित होते.
इंटर्नशिपचे महत्त्व व फायदे
विद्यार्थ्यांनी केलेली 80 तासांची इंटर्नशिप ही त्यांच्या शालेय अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी (जसे की कॉम्पुटर शॉप, वर्कशॉप, ब्युटी पार्लर, गॅरेज, वर्कस्टेशन) व्यावसायिक अनुभव घेण्याची अनमोल संधी ठरली. या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना कामाचे शिस्तबद्ध वातावरण, ग्राहकाशी संवाद, वेळेचे व्यवस्थापन, आणि प्रॅक्टिकल कौशल्ये आत्मसात करता आली. कित्येक विद्यार्थ्यांनी या अनुभवातून स्वतःच्या आवडीची ओळख पटवून भविष्यातील करिअरसाठी स्पष्ट दिशा ठरवली. शाळेत मिळणाऱ्या पुस्तकावर आधारित शिक्षणासोबतच प्रत्यक्ष हातावर काम करुन शिकणे (hands on activity) हा शिक्षणपद्धतीचा आधुनिक दृष्टिकोन प्रत्यक्ष अनुभवता आला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि पालकांचा अभिमान या कार्यक्रमादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की, आम्ही खऱ्या अर्थाने काम करताना शिकतोय, हे अनुभव शाळेच्या वर्गात बसून मिळाले नसते. पालकांनी देखील आपल्या पाल्याचा बदल पाहून समाधान व्यक्त केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत झाला असून, व्यवसायिक शिक्षणाची गरज आणि महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून, प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया कशी प्रभावी ठरते, याचे उत्तम उदाहरण या उपक्रमातून साकार झाले आहे. अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अपर्णा कुलकर्णी यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर