जम्मू, 30 जुलै (हिं.स.) : मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेत पुन्हा एकदा व्यत्यय आला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गावर बुधवारपासून बंदी घातली आहे. जम्मू-काश्मीर माहिती व जनसंपर्क विभागाच्या (डीआयपीआर) ट्विटर (एक्स) हँडलवर याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी सांगितले की, 31 जुलै रोजी भगवतीनगर, जम्मू येथून बालटाल आणि नुनवान या आधार छावण्यांकडे कोणताही भाविक काफिला पाठवण्यात येणार नाही. संततधार पाऊस आणि त्यातून निर्माण होणारी भूस्खलनाची व इतर आपत्तींची शक्यता लक्षात घऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीर विभागाचे आयुक्त विजय कुमार बिधुरी म्हणाले की, बुधवार (30 जुलै) सकाळपासूनच पाऊस सुरू आहे, त्यामुळे बालटाल आणि चंदनवाडी मार्गांवर भाविकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
यात्रा यावर्षी 3 जुलैला सुरू झाली असून, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन दिवशी समाप्त होणार आहे. यावर्षी आतापर्यंत जवळपास 4 लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुहेचे दर्शन घेतले आहे. यापूर्वी देखील 17 जुलै रोजी खराब हवामानामुळे यात्रा थांबवण्यात आली होती.पावसामुळे रस्ते आणि ट्रॅक स्लिप होण्याचा धोका असल्याने भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पुढील निर्णय हवामानाच्या स्थितीनुसार घेतले जातील. भाविकांना वेळोवेळी प्रशासनाकडून अद्ययावत माहिती देण्यात येणार आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी