भरणेंकडे कृषी मंत्रीपदाचे धुरा सोपवण्याची चर्चा
माणिकरावांना क्रीडा मंत्रीपद मिळण्याचे संकेत मुंबई, 31 जुलै (हिं.स.) : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोबाईलवर कथितपणे पत्ते खेळण्याचा आरोप झालेले कृषी मंत्री माणिकराव कोकांटेंचे कृषी खाते काढले जाणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिल
दत्तात्रय भरणे


माणिकरावांना क्रीडा मंत्रीपद मिळण्याचे संकेत

मुंबई, 31 जुलै (हिं.स.) : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोबाईलवर कथितपणे पत्ते खेळण्याचा आरोप झालेले कृषी मंत्री माणिकराव कोकांटेंचे कृषी खाते काढले जाणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. त्याऐवजी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जातेय. यासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार कृषि मंत्री माणिकराव यांना त्याच्या मंत्रिपदावरून काढून दुसरे खाते देण्याची शक्यता आहे. त्याऐवजी कोकाटेंना क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तर दत्तात्रेय भरणे यांची कृषिमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून पत्र देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदाची आतपर्यंतची कारकीर्द खूपच वादग्रस्त आहे. त्यांनी केलेल्या अनेक विधानांमुळे वाद निर्माण झाला होता. तशातच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडल्या जाणाऱ्या विधीमंडळात महत्त्वाची चर्चा सुरू असताना, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी गेम खेळत बसले होते. त्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावरून माणिकराव कोकाटेंवर टीकेची झोड उठली. तेव्हापासून कोकाटे यांना पदावरून दूर करा, अशा मागणी जोर धरू लागली होती. या प्रसंगी विविध नेतेमंडळींच्या बैठका झाल्या असून आता कोकाटे यांचा खातेबदल जवळपास निश्चित असल्याची चर्चा आहे. माणिकराव कोकाटे यांचे कृषिखाते आता दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात येणार आहे. तर दत्ता भरणे यांचे क्रीडा खाते कोकाटेंना देण्यात येणार आहे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande