मुंबई, 30 जुलै, (हिं.स.)। प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आमिर खान ने त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सितारे ज़मीन पर’ संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून ‘आमिर खान टॉकीज’ या त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर जगभरात रिलीज होणार आहे.
हे एक अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी पाऊल आहे. वर्ष २०२५ मधील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेला हा भावनिक कौटुंबिक ड्रामा आता थेट प्रेक्षकांच्या घरांपर्यंत आणि मोबाइल स्क्रीनपर्यंत पोहोचणार आहे.
या चित्रपटात आमिर खान व जेनेलिया देशमुख यांच्यासोबत बौद्धिक अपंगत्व (Intellectual Disability) असलेल्या १० कलाकारांचाही समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटातून प्रेम, विनोद आणि समावेशिता यांचा सुंदर संगम प्रेक्षकांसमोर येणार आहे.
भारतामध्ये हा चित्रपट फक्त ₹१०० भाडे भरून उपलब्ध होणार आहे, तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि स्पेनसह एकूण ३८ देशांमध्ये स्थानिक दरानुसार रेंटवर बघता येणार आहे.
आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
याबाबत आमिर खान म्हणाला, गेल्या १५ वर्षांपासून एक प्रश्न माझ्या मनात होता. लोक काही कारणास्तव थिएटरला जाऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत सिनेमा कसा पोहोचेल? आता वाटतं, हे शक्य झालंय. भारत सरकारच्या UPI योजनेमुळे इलेक्ट्रॉनिक पेमेंटमध्ये देश आघाडीवर आहे. इंटरनेट गावागावात पोहोचलेलं आहे आणि यूट्यूब आता जवळपास प्रत्येक डिव्हाइसचा भाग बनलेलं आहे. या सगळ्यांमुळे आम्ही सिनेमा आता घराघरांत आणि जगभर पोहोचवू शकतो.
माझं स्वप्न आहे की सिनेमा सगळ्यांसाठी असावा — तोही स्वस्तात, हवे त्या वेळी, आणि आपल्या मर्जीनुसार बघता येईल असा. जर हा मॉडेल यशस्वी झाला, तर जगभरातील क्रिएटिव्ह लोक कोणत्याही सीमांशिवाय आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतील. हे भविष्यातील सिनेमा वितरणासाठी एक गेम-चेंजर ठरू शकतं.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर