राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे कालवश
नागपूर, 31 जुलै (हि.स.) : राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांचे आज, गुरुवारी नागपुरात निधन झाले. मृत्यूसमयी त्या 97 वर्षांच्या होत्या. गेल्या 3 महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. नागपूरच्या धंतोली परिसरातील दे
प्रमिला ताई मेढे, पूर्व प्रधान संचालिका राष्ट्र सेविका समिती


नागपूर, 31 जुलै (हि.स.) : राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांचे आज, गुरुवारी नागपुरात निधन झाले. मृत्यूसमयी त्या 97 वर्षांच्या होत्या. गेल्या 3 महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. नागपूरच्या धंतोली परिसरातील देवी अहल्या मंदिर या समितीच्या कार्यालयात सकाळी 9 वाजेच्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार नागपुरातील एम्स रुग्णालयात त्यांचा देहदान केला जाणार आहे.

प्रमिलाताई मेढे यांचा जन्म 8 जून 1929 रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार येथे झाला. बी.ए., बी.टी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपूर येथील सी.पी. ऍण्ड बेरार महाविद्यालयात 2 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर त्या डीएजीपीटी कार्यालयात वरिष्ठ लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होत्या.बालपणापासूनच राष्ट्र सेविका समितीशी जोडलेल्या प्रमिलाताईंनी आपले आयुष्य समितीच्या कार्याला समर्पित करण्याचा निर्णय घेत स्वेच्छानिवृत्ती घेतली. राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापक केळकर मावशीसोबत प्रमिलाताईंनी देशभर प्रवास केला होता. त्यांच्याकडे

1978 ते 2003 या काळात त्यांना प्रमुख कार्यवाहिका म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2003 मध्ये त्या सहप्रमुख संचालिका आणि 2006 मध्ये प्रमुख संचालिका म्हणून निवडल्या गेल्या. त्यांच्याकडे 2006 ते 2012 या काळात प्रमुख संचालिका म्हणून जबाबदारी होती. त्यानंतर 20 जुलै 2012 रोजी त्यांनी शांताक्का यांना पदभार सोपवला.

स्व. प्रमिलाताईंनी समितीच्या कार्यासाठी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, दरबान, श्रीलंका यांसारख्या देशांत प्रवास केला होता. अमेरिकेतील न्यू जर्सी शहराच्या महापौरांनी त्यांना मानद नागरिकत्व बहाल केले होते. तसेच मुंबईच्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देवी अहिल्या मंदिर कार्यालयात येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रमिला ताईंच्या अंतिम इच्छेनुसार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता त्यांचे पार्थिव एम्स रुग्णालयाला सोपवण्यात येईल.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande