हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी प्रसिद्ध केले नोटिफिकेशन
मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.) : कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आज, शुक्रवारी यांसदर्भात नोटिफिकेशन जारी केले. कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे अशी मागणी गेल्या 40 वर्षांपासून होत होती. त्यामुळे याला मंजुरी मिळताच कोल्हापुरातील वकिलांनी आनंद व्यक्त केलाय.
कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच मंजूर झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेकदा केवळ तारखांसाठी मुंबईला जावे लागत असल्याने पक्षकारांचे मोठे हाल होत होते. यात वेळ, पैसा जात असल्याने कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे अशी मागणी होती. यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह विविध सामाजिक संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायमूर्तीपदी भूषण गवई यांची नियुक्ती झाल्यापासून खंडपीठ मंजुरीच्या प्रक्रियेला अधिक वेग आला होता. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती येणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारांचा ओघ वाढणार असल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. मुंबईला जाण्याचा फेरा वाचणार असल्याने पक्षकारांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी