मुंबई, 31 जुलै (हिं.स.)। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहितांनी कोर्टाचे आभार मानले. जय हिंद म्हणून त्यांनी सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, “माझी संस्था ही भारतीय आर्मी आहे. मला जी शिक्षा या 17 वर्षांत मिळाली, ती मी भोगली. जामिनावर बाहेर येऊनही मला बरंच काही सहन कराव लागलं. जे काही घडलं ते वाईट होतं. तपास यंत्रणा चुकीची नसते पण तपासयंत्रणेत काम करणारे काही अधिकारी चुकीचे असतात. त्यांचे आम्ही शिकार बनलो. अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा देण्यात आली. सामान्य माणसाला असा त्रास पुन्हा कधी सहन करायला लागू नये. मी आभारी आहे, कोर्टाला धन्यवाद देतो.”
एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. न्यायालयाने आपल्या निर्णयात पुराव्यांचा अभाव, चौकशीत त्रुटी आणि प्रक्रियात्मक चुका यांचा आधार घेत हा निर्णय दिला.या सर्वांवर दहशतवादी कट रचणे, हत्या करणे आणि धार्मिक उन्माद पसरवणे असे आरोप होते. निकालानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘या 17 वर्षांत मला जी शिक्षा मिळाली, ती मी भोगली. जामिनावर बाहेर येऊनही मला बरंच काही सहन करावं लागलं’.
2008 मध्ये एटीएसने प्रसाद पुरोहित यांना अटक केली होती. 2006 मध्ये अभिनव भारत संघटनेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग असल्याचा दावा एटीएसने केला होता. ज्याद्वारे निधी गोळा करण्यात आला होता आणि कट रचण्यात आला होता, असं एटीएसने म्हटलं होतं. पुरोहित या प्रकरणाच्या केंद्रस्थानी होती. कट रचण्याच्या बैठकांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि योजना अंमलात आणण्याच्या गरजेवर त्यांनी भाषणं दिली होती, ज्यात ‘सूड’ या शब्दाचा समावेश होता, असा दावा एटीएसने केला होता. एटीएसने असाही दावा केला होता की पुरोहित यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असताना स्फोटासाठी आरडीएक्स मिळवलं होतं. परंतु पुरोहित यांनी संरक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रांवरून हे सिद्ध केलं होतं की ते अशक्य आहे. ते एका गुप्तचर युनिटमध्ये काम करत होते आणि त्यांना कोणत्याही स्फोटकांपर्यंत पोहोचला आलं नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
लेफ्टनंट कर्नल पुरोहित हे भारतीय लष्करातील एक वरिष्ठ अधिकारी आहेत, ज्यांनी मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय) मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. ते हिंदी, संस्कृत आणि मराठी भाषांचे जाणकार मानले जातात. त्यांचे सहकारी त्यांना कडक शिस्तीचे आणि तीव्र विचारशक्ती असलेले अधिकारी म्हणून ओळखतात. विशेषतः दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये त्यांचे योगदान लक्षणीय राहिले आहे, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील भागांमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. जामिन मिळाल्यानंतर लष्कराने कर्नल पुरोहित यांना पुन्हा सेवेमध्ये बहाल केले होते. मात्र सध्या ते फील्ड ड्युटीवर नसून पुण्यात लष्कराच्या गुप्तचर विभागात प्रशासनिक भूमिका बजावत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode