रत्नागिरी : सहकार पुरस्कारासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
रत्नागिरी, 4 जुलै, (हिं. स.) : सहकार पुरस्कारासाठी येत्या १८ जुलैपर्यंत जिल्ह्यातील अधिकाधिक सहकारी संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसं
रत्नागिरी : सहकार पुरस्कारासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


रत्नागिरी, 4 जुलै, (हिं. स.) : सहकार पुरस्कारासाठी येत्या १८ जुलैपर्यंत जिल्ह्यातील अधिकाधिक सहकारी संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने जिल्ह्यातील सहकारी संस्थांची कार्यशाळा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात झाली. काश्मीर ते कन्याकुमारी देशभरात सहकार चळवळ बांधण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारिता मंत्रालयाची स्थापना केली. त्याअंतर्गत आयोजित केलेल्या सहकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त नामांकन १८ जुलैपर्यंत दाखल व्हावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले.

जिल्हा उपनिबंधक श्री. शिंदे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत मार्गदर्शन केले. विकास संस्था, फेडरेशन ग्रुप यांच्या समूहावर सर्व निकष, विविध माहिती दिली जाते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त गावातून सहकार पुरस्कारसाठी नामांकन यावेत, अशी अपेक्षा आहे. १८ जुलैपर्यंत ही नामांकने येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

आदर्श लेखा परिक्षण या विषयावर जिल्हा विशेष लेखा परीक्षक विनोद अंडुस्कर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शासनाच्या सहकार विभागाकडून वेळोवेळी शासन निर्णय परिपत्रके दिली जात असतात. या सर्वांच्या माध्यमातून सर्वांनी कामकाज करावे.

आदर्श संचालक मंडळ सभा विषयावर स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उत्तम पद्धतीने आपापली संस्था मार्गस्थ व्हावी. व्यवहार स्वच्छ राहावेत. ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली, तो सफल व्हावा, यासाठी संचालक मंडळांची सभा महत्त्वाची असते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. ग्राहक एसआयपी, एसडब्लूपी अशा नव्या गोष्टींकडे वळत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून संगणकामध्ये सुधारणा आली आहे. आधुनिक सेवा प्रदान करताना त्वरित निर्णय घेण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले.

शासकीय लेखापरीक्षक महेश जाधव यांनी आदर्श लेखापरीक्षण, सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण आणि कोमसापचे गजानन पाटील उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande