अहिल्यानगर, 4 जुलै (हिं.स.)। जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून आदर्श गाव हिवरेबाजार येथे एक पेड शहिदों के नाम! अभियान राबविण्यात आले.शहीद सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडे लावून त्यांच्या आठवणी जिवंत ठेऊन भावी पिढीला देश निष्ठेची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, शहीद जवानांच्या स्मृती कायम वृक्षाच्या रुपाने हिवरेबाजारमध्ये राहणार आहे. शहीद जवानांचे बलिदान प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद व स्फुर्ती देणारे आहे. हिवरे बाजारमध्ये शहिद जवानांच्या स्मरणार्थ 51 पिंपळाची झाडांची लागवड करण्यात आल्याचे सांगून, त्यांनी जय हिंदच्या कार्याचे कौतुक केले.
शिवाजी पालवे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात जय हिंदच्या माध्यमातून शहीद सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडे लावण्याचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. हे वृक्ष वीरांच्या पराक्रमाची साक्ष देत राहणार आहे. सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे यांनी प्रत्येक गावात हा उपक्रम राबविला गेल्यास आजी-माजी सैनिकांप्रती समाजात सन्मान वाढणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनाने व वीर जवानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni