मुंबई, 4 जुलै (हिं.स.) - बोरीवली येथील खादी ग्रामोद्योग असोसिएशन (कोरा केंद्र)या खाजगी ट्रस्टला दिलेल्या भूखंडाबाबत संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर असून कोणताही नियमभंग झालेला नाही, असे स्पष्ट करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली.
विधानसभेत आमदार वरुण देसाई यांनी हा विषय उपस्थित केला होता. यावर महसूलमंत्री म्हणाले की, सदर भूखंड १९४७ ते १९५३ या काळात ३९ एकर २२ गुंठ्यांमध्ये ट्रस्टला केवळ १३,३७५ रुपयांत देण्यात आला होता. मात्र, कालांतराने काही अटींचा भंग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, नियमानुसार वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यात आली असून त्यासाठी बाजारभावाच्या ५० टक्के रकमेची वसुली करण्यात आली आहे.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, २०१९ च्या धोरणाप्रमाणे वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्याची प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक असून, यामध्ये कोणतीही अनियमितता नाही. ट्रस्टने संबंधित अटींची पूर्तता केली आहे.
सदर ट्रस्टकडून सुमारे ६५० कोटी रुपयांचे सामाजिक प्रकल्प उभारण्यात येत असून, यामध्ये आधुनिक हॉस्पिटल, मेडिटेशन सेंटर, आणि सेवाभावी कार्य केंद्रांचा समावेश आहे. यामुळे बोरीवली परिसरात वैद्यकीय आणि मानसिक आरोग्य सेवांचा मोठ्या प्रमाणात लाभ समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
या भूखंडाच्या हस्तांतरणात कोणतीही विशेष सवलत किंवा अपवाद न करता, सर्व कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. हा प्रकल्प भविष्यात बोरीवलीकरांसाठी आरोग्य व अध्यात्म यांचा अद्वितीय संगम ठरेल, असे सांगत महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी