मुंबई, 4 जुलै (हिं.स.)।
राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे, असे उत्तर देतात. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले, त्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतील, तर हे राज्याला भूषणावह नाही. ही सर्व परिस्थिती बिघडवण्याचे काम सरकारने केले आहे, असा सरकारवर हल्लाबोल ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.
विधानसभेत बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात खरीप हंगामाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. DBT च्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले, असा गवगवा करण्यात आला. शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य समर्थन मूल्याने खरेदी केले गेले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने योजना आणली; आणि ते धान्य घेतल्यानंतर ते पैसे देणे भाग आहे. पण एक वर्षापासून सरकारने शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. शेतकऱ्याने शेती कशी करावी, हा प्रश्न आहे.
लातूर जिल्ह्यातील एक शेतकरी स्वतःला औताला जुंपून घेतो आणि शेतकरी भगिनी त्याला हाकते आहे, असे चित्र संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. लातूर जिल्ह्यातील ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणीय नाही. राज्यातील शेतकऱ्याने स्वतःला जुंपून घ्यावे, आणि मग नंतर सरकारने त्या शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे, त्याला बैलजोडी देऊन मदत करावी, त्यासाठी वाट बघावी का?
शेतकऱ्यांवर जिथे अन्याय झाला, तिथे खासदारकी सोडली, ही खुर्चीची लढाई नाही पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, सत्तेतील लोक जर शेतकऱ्यांचा अपमान करत असतील, तर हे कदापि सहन केले जाणार नाही. काल सभागृहात मंत्री नव्हते, अदृश्य लॉबीमध्ये अधिकारी नाहीत. शेतकऱ्यांविषयी या सरकारची काय मानसिकता आहे, हे जनतेने पाहिले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्याची चेष्टा पोलिस प्रशासन आणि व्यवस्थेच्या माध्यमातून केली गेली, अशी परिस्थिती या राज्याची झाली आहे. खरीप हंगामाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. हे पैसे व्याजासकट शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत.
राज्यात ३४,७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, ८२,९९९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी राज्य सरकारने १०० कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. सर्वाधिक नुकसान नागपूर विभागात १०,०९५ हेक्टरवरील २६,२८७ शेतकऱ्यांचे झाले आहे. कोकणात ३,००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, २,९५९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पुणे महसूल विभागात २,६९२ हेक्टर बाधित झाले. ८२,९९९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केवळ १०० कोटी रुपयांची मदत – हजारो कोटींच्या नुकसानीपुढे अत्यंत तुटपुंजी. निसर्गही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही, आणि सरकारही नाही – अशी अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे नाईलाजास्तव शेतकरी आत्महत्या करतो. सरकारने प्रथम प्राधान्य शेतकऱ्याला दिलं पाहिजे, असेही पटोले म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने