सोलापूर, 4 जुलै, (हिं.स.)। व्यसनमुक्त भारत आणि राष्ट्रभक्त तरुण घडविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराची गरज आहे,असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. सोलापुरातील महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्यावतीने हुतात्मा स्मृती मंदिरात विश्वराज रिस्पॉन्सीबल रिव्होलेशन नागपूर प्रस्तुत संघ गंगा के तीन भगीरथ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री गिरीश महाजन बोलत होते.
याप्रसंगी ते म्हणाले की, सामान्य स्वयंसेवक असलेले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे आज देशात नाव जगाच्या नकाशावर गेले आहे. आपण सुद्धा संघामुळेच सात वेळा आमदार झालो आहोत. त्यामुळे लहानपणापासूनच संघाच्या विचारांची सर्वांना गरज आहे, असे सांगत सकाळी - सकाळी पोपटपंची करणाऱ्यांना संघाच्या विचारांची गरज असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे नाव न घेता गिरीश महाजन यांनी यावेळी चिमटा काढला . मुस्लिम लीग स्ट्रॉंग होत असताना वंदे मातरम आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू समाजाला संघटित होण्यासाठी तरुणांनी शालेय जीवनापासूनच हाती घेतलेला लढा,लाठी- काठीपासून सुरू झालेले संघाचे कार्य आणि त्याला द्यावयाची गती यासह शरीर, मन आणि बुद्धीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून चालणारे काम,डॉक्टर केशव हेडगेवार यांनी संघाच्या कार्याची केवळ ९ वर्षात वाढवलेली व्याप्ती आणि त्याचे महात्मा गांधी यांनी केलेले तोंड भरून कौतुक या विषयावर या नाटकाद्वारे प्रकाश टाकण्यात आला.डॉक्टर हेडगेवार यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले मात्र काँग्रेसमध्ये असे संघटन का होऊ शकले नाही ? याबाबत महात्मा गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस पक्षात बरेच चांगले लोक आहेत, मात्र मनोवृत्तीचा फरक असल्याचे हेडगेवार यांनी महात्मा गांधी यांना दिलेले सडेतोड उत्तर तसेच डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी यांची भेट हा प्रसंग लक्षवेधी ठरला . संघ केवळ हिंदूंचे संघटन करतोय,अन्य समाजाचे का करत नाही, या महात्मा गांधी यांच्या प्रश्नाला डॉक्टर हेडगेवार यांनी स्वयंस्फूर्तीने दिलेले उत्तर अनेकांना भावले.नागपूर आणि परिसरातील मुस्लिम हिंदूंना त्रास देत असताना वंदे मातरम आंदोलनाचा लढा हाती घेत तरुणांनी संघटित हिंदू समाज हेच सर्वांचे उत्तर असल्याचे नाटकाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. क्रांतिकारी विचाराचे आणि काँग्रेसचे सक्रिय सदस्य असलेले डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रहितासाठी आणि हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली,यासह डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांचा संघर्ष नाटकामधून सांगण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून शिस्त, त्याग आणि समर्पणाचा संदेश देणारे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रय उर्फ बाळासाहेब देवरस या महान व्यक्तींच्या जीवनकार्यावरसुद्धा नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा स्मृती मंदिराच्या रंगमंचावर संघ गंगा के तीन भगीरथ हे तीन अंकी नाटक सादर करण्यात आले. विश्वराज रिस्पॉन्सईबल रिव्हॉलेशन आणि राधिका क्रिएशन प्रस्तुत श्रीधर गाडगे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. तर संजय पेंडसे हे निर्देशक आहेत. सारिका पेंडसे यांची निर्मिती असून सतीश पेंडसे यांचे नेपथ्य आहे. निर्मिती सहाय्य म्हणून रमण सेनाड, नीलिमा बावणे आणि अरुणा पुरोहित यांनी काम पाहिले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, अमोल धाबळे, जितेश कुलकर्णी, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर,जिल्हा संघचालक सुनील इंगळे, शहर संघचालक राजेंद्र काटवे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,शहाजी पवार, अविनाश महागावकर, राम तडवळकर यांच्यासह श्रोते व मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड