सोलापूर, 4 जुलै, (हिं.स.)। संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविकांनी पंढरीच्या आषाढ वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले असून, रस्त्यांवरून निघालेल्या दिंड्यांनी हरिनामाचा गजर करत गावागावांत भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले आहे.विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या गजरात, अभंगवाणीच्या स्वरांत, आणि टाळ-मृदंगांच्या निनादात राज्याच्या विविध भागांतून निघालेल्या दिंड्या सध्या गावोगावी मुक्कामी थांबत आहेत. गावागावांत हरिनाम संकीर्तनाच्या कार्यक्रमामुळे चहूबाजूंना एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवत आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंत वारकऱ्यांच्या गजरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. या ठिकाणी ग्रामस्थ, ग्रामपंचायती तसेच अनेक सामाजिक संस्था आणि मंडळे या वारकऱ्यांची सेवाभावाने मदत करत आहेत. कुठे नाश्त्याची व्यवस्था आहे, तर कुठे पोळी-भाजीचा गरम जेवणाचा आस्वाद दिला जातोय. वारीसाठी छोट्या-मोठ्या दिंड्या पंढरपूरच्या रस्त्यांकडे गावांमध्ये विविध मंदिरे, समाजमंदिरे, शाळा यांमधून सध्या दुपारी व रात्रीच्या वेळी विसावा घेत असल्याने अशा ठिकाणी वारकऱ्यांमुळे ही ठिकाणे फुलून गेली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड