अकोला, 5 जुलै (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील चोहोट्टा बाजार. अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक येथील एक रूग्णाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचार घेत असताना निधन झाले. हा रूग्ण कॉलराबाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे या गावात कॉलरा उद्रेक जाहीर करण्यात आला असून, प्रतिबंधात्मक कार्यवाही व उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या ४ पथकांद्वारे धामणा गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. पिण्याचे पाणी उकळून व आर. ओ. पाण्याचा वापर किंवा मेडिक्लोरचा उपयोग करण्याबाबत आरोग्य शिक्षण नागरिकांना देण्यात येत आहे. करोडी येथील उपकेंद्रामार्फत औषधोपचार होत आहेत.
गावात ८० घरे असून, प्रत्येक घरी तपासणी करण्यात आली आहे. ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखी अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळवून देण्यात येत आहेत. ठिकठिकाणच्या पाण्याचे १५ नमुने तपासण्यात येत आहेत. सर्वेक्षण, उपचारासाठी २ वैद्यकीय अधिकारी, १ समुदाय आरोग्य अधिकारी, २ आरोग्य सहायक, ४ आरोग्यसेवक, ३ आशासेविका, अंगणवाडी सेविका असे मनुष्यबळ कार्यरत आहे.
जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्याकडून साथ नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांना ताप, मळमळ, हगवण, पोटदुखी, डोकेदुखी असे कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित गावात पथकामार्फत तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे