
कोल्हापूर, 30 मे (हिं.स.)। कोल्हापूर शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेच्या विशेष आरोग्य पथकाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दोन मोठ्या व्यावसायिकांवर थेट कारवाई करून जागेवरच दंड वसूल केला.
नागाळा पार्क परिसर येथील एका चहा गाडी व्यावसायिकाने रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना ₹७०० चा दंड करण्यात आला. येथील महालक्ष्मी चेंबर्समधील मयुर वुंडली यांनी सार्वजनिक जागेत कचरा टाकल्याबद्दल त्यांना ₹१,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राकेश लोखंडे, मुनीर फरास आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई पूर्ण केली.
शहरातील सर्व नागरिक, व्यावसायिक, दुकानदार आणि फेरीवाल्यांनी आपला दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत 'घंटागाडी' किंवा कचरा वाहकांकडेच सुपूर्द करावा. जर कोणीही कचरा रस्त्यावर, उघड्या जागेत किंवा नाल्यांमध्ये टाकताना आढळल्यास, नियंत्रण अधिनियम १९९८ मधील तरतुदींनुसार अधिक कडक दंडात्मक कारवाई केली जाईल किंवा थेट गुन्हा नोंदवण्यात येईल. आपल्या शहराला स्वच्छ ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, यात प्रशासनाला सहकार्य करा.असे आवाहन कोल्हापूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar