अहमदनगर, 6 जुलै (हिं.स.) -
आपल्याला पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सहकारी संस्थांच्या सदस्यांना केंद्रस्थानी ठेवणे, या तीन गोष्टींची अंमलबजावणी या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात ताकदीने करावी लागणार आहे. पारदर्शकतेशिवाय सहकार दीर्घकाळ टिकू शकत नाही आणि पारदर्शकतेचा अभाव सहकार्याच्या भावनेला हानी पोहोचवतो. जिथे तंत्रज्ञानाचा स्वीकार केला जात नाही, त्या स्पर्धेत सहकार टिकू शकत नाही. ज्या सहकारी संस्थांमध्ये सदस्यांचे हित सर्वोपरी मानले जात नाही, त्या संस्था टिकू शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात, सर्व सहकार नेत्यांनी या तीन गोष्टी त्यांच्या कार्यक्षेत्रात राबवल्या पाहिजे आणि त्या कार्यसंस्कृतीचा भाग बनवल्या पाहिजेत. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात ही भावना पसरवण्याचे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने गुजरातमधील आणंद इथे आज आयोजित विशेष कार्यक्रम केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शाह यांनी नव्याने स्थापन झालेल्या सरदार पटेल सहकारी दुग्धव्यवसाय महासंघ लिमिटेड या बहुराज्यीय सहकारी संस्थेचे उद्घाटन केले तसेच या संस्थेच्या बोधचिन्हाचेही अनावरण केले. त्यांनी खेडा इथल्या अमूल चीज प्रकल्पाच्या विस्ताराचे आणि मोगर इथल्या अत्याधुनिक चॉकलेट प्रकल्पाचेही आभासी पद्धतीने उद्घाटन केले. यासोबतच केंद्रीय सहकार मंत्र्यांनी आणंद इथल्या भारतीय राष्ट्रीय सहकारी दुग्ध महासंघाच्या (NCDFI) नवीन कार्यालयाच्या इमारतीचे तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (NDDB) कार्यालय परिसरात असलेल्या मणिबेन पटेल भवनचे उद्घाटन केले, याशिवाय त्यांनी रेडी टू यूज कल्चर प्लांट हा प्रकल्पही देशाला समर्पित केला.
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने (GCMMF) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमित शाह यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. आजच्याच दिवशी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा पश्चिम बंगालमध्ये जन्म झाला होता, त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. श्यामा प्रसादजी यांनी देशासमोरील अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी स्वातंत्र्य मिळण्याआधीपासूनच लोकांना संघटित केले होते, असे ते म्हणाले. श्यामा प्रसाद मुखर्जी नसते तर काश्मीर कधीही भारताचा अविभाज्य भाग झाला नसता, असे त्यांनी सांगितले. डॉ. श्यामा प्रसादजी यांनीच दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज देशात स्वीकारले जाणार नाहीत अशी घोषणा दिली होती आणि काश्मीरसाठी स्वतःचे बलिदान दिले, असे शाह यांनी नमूद केले. आज डॉ. श्यामा प्रसादजी यांच्यामुळेच पश्चिम बंगालही भारताचा भाग आहे, असे ते म्हणाले.
वैदिक काळापासून आपल्या देशात सहकार ही सामाजिक परंपरा म्हणून अस्तित्वात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परंपरेला वैधानिक स्वरूप मिळवून दिले, तसेच 4 वर्षांपूर्वी याच दिवशी देशात पहिल्यांदाच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही बाबही अमित शाह यांनी नमूद केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 31 कोटी लोकांशी जोडलेल्या 8 लाख 40 हजारांहून अधिक सहकारी संस्थांमध्ये नवे प्राण फुंकले आहेत. दूध उत्पादन ते बँकिंग क्षेत्र, साखर कारखान्यांपासून मार्केटिंग आणि रोख कर्ज ते डिजिटल पेमेंटपर्यंत, सहकारी सोसायट्या आज देशाच्या आर्थिक विकासात पूर्ण क्षमतेने योगदान देत आहेत, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाने आपल्या स्थापनेनंतरच्या 4 वर्षात 60 हून अधिक उपक्रम हाती घेतले आहेत, असे केंद्रीय सहकार मंत्र्यांनी सांगितले. हे सर्व उपक्रम पाच 'पी' वर आधारित आहेत -
1.लोक (पिपल) - देशातील सामान्य लोक हे सर्व उपक्रमांचे लाभार्थी आहेत
2. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (पीएसीएस) - आम्ही प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था मजबूत करत आहोत.
3.व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) - प्रत्येक प्रकारच्या सहकारी उपक्रमासाठी डिजिटल तसेच राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
4. धोरण (पॉलिसी) - सहकारी धोरणाचे उद्दिष्ट सदस्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे हे आहे. अगदी मिठाच्या उत्पादनातही नफा, थेट या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळणार आहे.
5. समृद्धी (प्रॉस्पेरिटी) - या अंतर्गत, गुजरातमधील आमच्या 36 लाख भगिनी आणि देशाच्या इतर भागातील 20 लाख भगिनी दररोज कठोर परिश्रम करत आहेत. यामुळे 80 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे आणि पुढच्या वर्षी ही उलाढाल 1 लाख कोटींच्या वर जाईल या 56 लाख बहिणीच्या खात्यात हा नफा थेट जमा होत आहे. समृद्धी ही एखाद्या व्यक्तीची नसून संपूर्ण समाजाची असते, समृद्धी ही काही श्रीमंत लोकांची नसून गरीब, कामगार आणि शेतकऱ्यांचीही असते आणि याच विश्वासाने पंतप्रधान मोदी यांनी हे 60 उपक्रम हाती घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सरदार पटेल सहकारी दुग्ध महासंघ, दुग्ध क्षेत्रात संघटित बाजारपेठ, इनपुट सेवा, दुधाची योग्य खरेदी, किंमतीतील फरक आणि चक्रीय अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्ण करण्यासाठी काम करेल, असे शाह म्हणाले. ही संघटना अमूलच्या धर्तीवर, देशातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळवून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कच्छ जिल्हा मीठ सहकारी संस्थेच्या रूपात एक नवीन मॉडेल समिती सुरू करण्यात आली आहे, जी येत्या काळात मीठ उत्पादन करणाऱ्या प्रत्येक कामगारासाठी अमूलसारखी एक मजबूत सहकारी चळवळ बनेल, हे त्यांनी अधोरेखित केले. आज अमूल एफएमसीजी ब्रँड हा भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मजबूत ब्रँड आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात आपण सहकार संस्कृतीचा विस्तार करण्याचा संकल्प केला आहे, असे ते म्हणाले. कालच त्रिभुवनदास पटेल यांच्या नावाने ‘त्रिभुवन सहकारी विद्यापीठ’ स्थापन करण्यात आले आणि आज सुमारे 10 खूप मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, असे केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2 लाख नव्या प्राथमिक कृषी पत संस्था PACS, सहकार विद्यापीठ, राष्ट्रीय सहकार माहिती संकलन, धान्य विक्री आणि उत्पादनाशी निगडित तीन राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्था आणि दुग्धोत्पादन क्षेत्रासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या तीन राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्था, हे सर्व उपक्रम आपल्या देशातील सहकार चळवळीला मोठ्या प्रमाणात बळकटी देणारे आहेत.
अमित शाह यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने, मोगर इथल्या त्रिभुवनदास फूड कॉम्प्लेक्स येथील 105 कोटी रुपये मूल्याच्या अमूल चॉकलेटच्या विस्तारित प्रकल्पाचे आणि खत्रज इथल्या 260 कोटी रुपये मूल्यांच्या डॉ. वर्गीस कुरिअन चीज प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. अमूलच्या चॉकलेट प्रकल्पाच्या विस्तारीकरणामुळे, प्रकल्पाची उत्पादन क्षमता 30 टनापासून 60 टन प्रति दिन इतकी वृद्धिंगत होणार आहे. याच बरोबर अल्ट्रा हाय टेम्परेचर (UHT) उच्च तापमानावर उकळण्याची प्रक्रिया केलेले दूध, व्हे आधारित पेये, मोझरेला चीज, प्रक्रिया केलेले चीज पॅकिंग, स्मार्ट साठवणगृह इत्यादींचे उद्घाटन करण्यात आले.
त्याबरोबर, केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या हस्ते आज, 45 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या रेडी टू यूज कल्चरच्या (RUC), 32 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भारतीय राष्ट्रीय सहकारी दुग्धोत्पादन फेडरेशन (NCDFI) च्या नवीन मुख्यालयाचे उद्धाटन केले आणि आणंद इथल्या राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाच्या (NDDB) मुख्यालयाच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीची पायाभरणीही केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी