मिरजचे शासकीय उपचार केंद्र बजावणार व्यसनमुक्ती चळवळीत मोलाची भूमिका
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात व्यसनमुक्तीची चळवळ उभी केली आहे. कायद्याचा धाक, प्रबोधन आणि व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ही त्रिसूत्री यात राबवली जात आहे. अमली
सांगली


राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात व्यसनमुक्तीची चळवळ उभी केली आहे. कायद्याचा धाक, प्रबोधन आणि व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ही त्रिसूत्री यात राबवली जात आहे. अमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एनकॉर्ड समितीच्या माध्यमातूनही विविध उपाययोजना आखल्या गेल्या. यातील व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या अनुषंगाने एकूणच अमली पदार्थांचा धोका पाहता व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राची भूमिका मोलाची ठरणार आहे. यावर या लेखामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.

अंमली व मादक पदार्थ म्हणजे काय ?

अंमली किंवा मादक पदार्थ म्हणजे असे रासायनिक किंवा नैसर्गिक पदार्थ जे मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात आणि व्यक्तिला तात्पुरत्या झिंग, आनंद, हलकेपणा, स्फूर्ती किंवा विस्मरण देतात. परंतु कालांतराने या पदार्थांवर शरीर आणि मन पूर्णपणे अवलंबून होऊन व्यसनाची साखळी तयार होते.

अमली पदार्थाचे साधारण ओपिओइड्स, सायकोस्टिम्युलंट्स, कॅनाबिस पदार्थ, सिंथेटिक ड्रग्स, स्निफिंग सोल्युशन, आणि झोपेच्या गोळ्या असे वर्गीकरण केले जाते. ओपिओइड्समध्ये ब्राऊन शुगर, हेरॉइन यांचा, सायकोस्टिम्युलंट्समध्ये कोकेन, मेथाम्फेटामिन, एमडी यांचा तसेच कॅनाबिस पदार्थांमध्ये गांजा, चरस यांचा, सिंथेटिक ड्रग्समध्ये एलएसडी, एमडीएमए यांचा आणि स्निफिंग सोल्युशनमध्ये व्हाइटनर आदिंचा समावेश होतो.

व्यसन सुरू होण्यामागची कारणे

कौटुंबिक तणाव :

भांडण, आर्थिक संकट, तणावपूर्ण वातावरण, मित्रपरिवाराचा दबाव, मनोरंजन, ट्रेंड, फॅशन म्हणून, मानसिक आजार, नैराश्य, चिंता यावर स्वतःच्या मनाने शोधलेला उपाय म्हणून, कमकुवत आत्मविश्वास, एकाकीपणा, गुन्हेगारी प्रवृत्ती, असुरक्षितता, चुकीची संगत, फिल्मी प्रभाव, सोशल मीडिया, जाहिरातींचा परिणाम

व्यसनांचा मानसिक परिणाम

अमली पदार्थ व्यसनामुळे विविध मानसिक विकार निर्माण होतात. यामध्ये नैराश्य (Depression), चिंता विकार (Anxiety Disorders), मानसविक्षिप्तता (Drug Induced Psychosis), व्यक्तिमत्त्व विकार (Personality Disorders) आत्महत्येचा धोका वाढतो. स्मरणशक्ती, एकाग्रता, निर्णयक्षमता यावर परिणाम होतो. व्यक्ती आत्मकेंद्रित, संशयी, आक्रमक बनते.

व्यसनांचा शारीरिक परिणाम

अंमली पदार्थांचा शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतो. यकृत, हृदय, मेंदू, फुफ्फुसे यांचे नुकसान होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. एड्स, हेपाटायटिससारख्या आजारांचा धोका (इंजेक्शनद्वारे व्यसन करताना) असतो. अपचन, वजन घटणे, थकवा, अशक्तपणा, ओव्हरडोसमुळे अकस्मात मृत्यू होण्याचा धोका असतो.

व्यसनांचे सामाजिक परिणाम

व्यसनाधीन व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाचे जीवन उद्‌ध्वस्त होते. कुटुंबात सतत वाद, आर्थिक बुडवणूक, नातेवाईकांकडून अपमान, समाजाकडून बहिष्कार यामुळे घरात तणावाचे वातावरण राहते. शिक्षण बिघडते, करिअर संपते. चोरी, फसवणूक, हिंसाचार, अपघात वाढतात. रस्त्यावर बेवारस अवस्थेत फिरणारे युवक, गुन्हेगारांची संख्या वाढते. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः लैंगिक शोषण, मानसिक छळ, दुर्लक्षितता वाढते. समाजातील एकूणच शांतता, सुरक्षितता धोक्यात येते.

उपचार प्रक्रिया -

व्यसनमुक्ती ही केवळ व्यक्तिची लढाई नाही, तर संपूर्ण कुटुंब व समाजाची जबाबदारी आहे. अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तिंना रागावून, शिक्षा करून, समाजातून बाहेर काढून काही साध्य होत नाही. कारण व्यसन हा एक मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आजार आहे. त्यावर उपाययोजना, उपचार आणि पुनर्वसन यांची सांगड घालणे गरजेचे आहे. अमली पदार्थांच्या व्यसनावर उपचार करणे ही एक जटिल आणि बहुआयामी प्रक्रिया आहे. यामध्ये वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनांचा समावेश होतो.

वैद्यकीय उपचार -

1) डिटॉक्सिफिकेशन : ही प्रक्रिया व्यक्तिच्या शरीरातून अमली पदार्थ काढून टाकण्यासाठी केली जाते. यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली रूग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते, कारण यावेळी व्यक्तीला तीव्र लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. रुग्णांच्या शारीरिक आजार व लक्षणासाठी उपायकारिता मेडिसीन विभागाची मदत घेतली जाते. कधी कधी रुग्णाला ICU मध्ये उपचाराची गरज पडते.

2) मानसोपचार

अ) कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी (CBT): ही थेरपी व्यक्तीच्या विचारसरणी आणि वागणुकीतील बदल घडवून आणते. यामुळे व्यसनाधीन व्यक्तिला अमली पदार्थांचा वापर टाळण्यासाठी नवीन रणनीती शिकता येतात.

आ) मोटिव्हेशनल इंटरव्हेंशन थेरपी (MIT): यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाते.

इ) कौटुंबिक थेरपी: कुटुंबातील सदस्यांना समाविष्ट करून व्यक्तीच्या भावनिक आणि सामाजिक समस्या वर उपाय शोधले जातात.

शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, मिरज

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्यसनमुक्ती सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अशोक काकडे व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांच्या सूचनांनुसार व वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांच्या समन्वयाने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजकिरण साळुंखे, डॉ. महेश कुंभार डॉ. विक्रांत हजारे यांची मुख्य टीम या केंद्रात कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मानसशास्त्रज्ञ अभिजीत आंबेकर आणि अमृता सोनवणे, नर्सिंग विभागांतर्गत अधिसेविका वंदना शहाणे, मानसोपचार तज्ज्ञ परिसेविका प्रिया राऊळ आणि प्राजक्ता काकडे तसेच, समाज सेवा अधीक्षक संजय खाडे व सूर्यप्रकाश राऊत व इतर कर्मचारी यांचा चमू टीम रुग्णांसाठी काम करतो. गंभीर रूग्णांबाबतीत आवश्यकतेनुसार औषध वैद्यक शास्त्र तज्ज्ञ डॉ. भोसले आणि डॉ. मगदूम यांची मदत घेण्यात येते.

हे व्यसनमुक्ती केंद्र 6 प्रकारच्या अद्ययावत यंत्रसामग्रीने सज्ज करण्यात आले आहे. ही यंत्रसामुग्री राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. अमली पदार्थांमुळे भास, भ्रम, हिंसकपणा आत्महत्येचे विचार असे मानसिक आजार निर्माण होतात. त्यावर उपचार करण्यासाठी मॉडिफाइड इसीटी मशीन वापरण्यात येणार आहे. अमली पदार्थ आणि नशेच्या पदार्थांमुळे निर्माण होणारे भीती, घाबरटपणा, बेचैनी कमी करण्यासाठी मल्टी बिहेवियरल थेरपी' मशीन वापरण्यात येणार आहे. अमली पदार्थ घेण्यासाठी निर्माण होणारी तल्लफ दूर करण्यासाठी अव्हर्जन थेरपी मशीनचा उपयोग केला जाणार आहे. उदासपणा आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी सेरेब्रल स्टिम्युलेशन मशीन आणि क्रॅनियल नर्व्ह स्टिम्युलेशन मशीन वापरण्यात येईल. तर व्यसनाची इच्छा कमी करण्यासाठी, मनामधील उदासपणा व घाबरटपणा दूर करण्यासाठी, उतावीळपणा घालवून स्थिरता आणण्यासाठी RTMS म्हणजेच रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन मशीनचा वापर करण्यात येईल.

उपचार केंद्रात प्रवेश प्रक्रिया

या केंद्रात प्रवेशासाठी रुग्णास नातेवाईकांसोबत मनोविकार बाह्यरुग्ण विभाग नंबर 39 येथे डॉक्टरांना दाखवावे. डॉक्टर तपासणी करून रुग्ण दाखल करण्यायोग्य असल्यास नातेवाईकाबरोबर रुग्णास भरती केले जाईल. आंतररूग्ण उपचार साधारणपणे दोन ते तीन आठवडेपर्यंत चालतात. उपचार व निवास हे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत विनाशुल्क होतात. त्यासाठी रुग्णाला आवश्यक ती शासकीय कागदपत्रे सादर करावी लागतात. जर रूग्णांकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर साधारणपणे तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. हेच उपचार जर खाजगी रुग्णालयात घेतले तर साधारण 25 ते 40 हजार इतका खर्च येतो. शिवाय व्यसनाधीन व त्यांच्या कुटुंबियांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

वाढती व्यसनाधीनता चिंतेचा विषय बनला आहे. भावी पिढीला या संकटापासून वाचवणे, हे एक आव्हान बनले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळीच हा धोका ओळखून जानेवारी महिन्यापासून अमली पदार्थमुक्तीची चळवळ हाती घेतली आहे. या अनुषंगाने मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले अमली पदार्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची भूमिका मोलाची ठरणार असून हे केवळ उपचाराचे ठिकाण न ठरता नवजीवन देणारे पुनर्वसनाचे एक आधारस्तंभ आहे, हे निश्चित!

(संकलन - संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande