युक्रेन युद्धाबद्दल भारताला अनुचितपणे लक्ष्य केले जाऊ नये - एस. जयशंकर
नवी दिल्ली , 31 ऑगस्ट (हिं.स.)।भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी (३० ऑगस्ट) फिनलंडच्या त्यांच्या समकक्ष एलिना वाल्टोनन यांच्याशी युक्रेन युद्धाच्या संदर्भात फोनवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेन युद्धाच्य
एस. जयशंकर


नवी दिल्ली , 31 ऑगस्ट (हिं.स.)।भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी (३० ऑगस्ट) फिनलंडच्या त्यांच्या समकक्ष एलिना वाल्टोनन यांच्याशी युक्रेन युद्धाच्या संदर्भात फोनवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेन युद्धाच्या संदर्भात भारताला अनुचितपणे लक्ष्य करण्यात येऊ नये.

परराष्ट्र मंत्र्यांच्या या टिप्पणीचा संबंध अमेरिकेने केलेल्या त्या आरोपांशी जोडला जात आहे, ज्यात म्हटले आहे की भारत रशियाकडून सवलतीच्या दरात खनिज तेल खरेदी करून युक्रेन युद्धात मॉस्कोच्या युद्धयंत्रणेला मदत करत आहे. एस. जयशंकर यांनी या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये जयशंकर म्हणाले, “आमची चर्चा रशिया-युक्रेन संघर्ष आणि त्याचे परिणाम यावर केंद्रित होती. या संदर्भात भारताला अनुचितपणे लक्ष्य केले जाऊ नये. आम्ही नेहमीच चर्चा आणि राजनैतिक उपाययोजनांना पाठिंबा दिला आहे.”

दरम्यान, अमेरिकेच्या व्हाइट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी या आठवड्यात म्हटले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर लावलेला ५० टक्के टॅरिफ फक्त भारताच्या अनुचित व्यापाराविषयी नाही, तर त्यामागचा उद्देश मॉस्कोच्या युद्धयंत्रणेला नवी दिल्लीकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा मार्ग बंद करणे हा देखील आहे.तथापि, भारताने आधीच अमेरिकेच्या या आरोपांना फेटाळले आहे. विशेष म्हणजे, अमेरिका रशियाकडून सर्वाधिक तेल आयात करणाऱ्या चीनवर मात्र आश्चर्यकारकपणे टीका करत नाही.

अमेरिकेने रशियाकडून खनिज तेलाची सातत्याने खरेदी केल्याबद्दल भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतावर लागू होणारे एकूण अतिरिक्त टॅरिफ ५० टक्के झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande