रशियन तेलाच्या ‘ब्राह्मण कनेक्शन’ वर दिली परखड प्रतिक्रिया
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर (हिं.स.) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नेवारो यांनी एक वादग्रस्त आणि बालिश विधान केलं आहे. यात त्यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करून त्यातून ब्राह्मण समाजाला नफा मिळतो असा दावा केला आहे. या विधानानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पीटर नेवारो यांनी असा दावा केला की, रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा घेत भारत स्वस्त तेल खरेदी करत आहे आणि ते रिफाइन करून युरोप व इतर देशांना विकत आहे. यामुळे भारतीयांच्या किमतीवर ब्राह्मण समाज नफा कमावत आहे. त्याला उत्तर देताना निशिकांत दुबे म्हणाले की, अमेरिका म्हणते की रशियाच्या तेलाचा फायदा ब्राह्मणांना होत आहे. पण तेल खरेदी कोण करतंय? भारत सरकार. मग पंतप्रधान मोदी ब्राह्मण आहेत का? आणि खाजगी कंपन्यांचे कोणते मालक ब्राह्मण आहेत ? असे प्रश्न दुबे यांनी उपस्थित केले.
पीटर यांचे विधान ऐकून असे वाटते की राहुल गांधींच्या अज्ञानाची स्क्रिप्ट थेट अमेरिकेत पोहोचली आहे. अमेरिका सत्य नडेला, सुंदर पिचाई, इंदिरा नुई यांच्याविषयी विचार करायला हवा हे सगळे ब्राह्मण असून अमेरिकन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
नेवारो यांनी भारतावर आरोप केला की, नवी दिल्ली ही आता क्रेमलिनसाठी लॉन्ड्रिंग सेंटर (लाँड्रोमॅट) बनली आहे. भारतीय जनतेच्या किमतीवर ब्राह्मणांना फायदा होत आहे आणि हे थांबवायला हवं. या बेताल वक्तव्यानंतर नेवारो म्हणाले की, भारताकडून मिळणाऱ्या पैशामुळे रशिया आपले युद्धखर्च भागवत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर युक्रेनियन नागरिकांचे मृत्यू होत आहेत. तसेच, त्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणाला देखील पाठिंबा दर्शवला.
अखेर, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना आश्चर्य व्यक्त केले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा नेता असूनही मोदी पुतिन आणि शी जिनपिंग यांच्याशी इतके जवळचे संबंध का आहेत, हे मला समजत नाही असेही पीटर म्हणालेत.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी