मुंबई, 31 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज (रविवार ) मुंबईत सहकुटुंब लालबागच्या राजा सहित विविध गणेशमंडपांना भेट देऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत नड्डा यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत गणेशभक्तांसोबत भक्तीमय वातावरणात सहभाग घेतला.
नड्डा यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' येथे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशमूर्ती, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सरिता फडणवीस, अमृता फडणवीस, तसेच नड्डा यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
यानंतर नड्डा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अमित साटम तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. भक्तिपूर्वक केलेल्या या पूजेत गणेशभक्तांची प्रचंड गर्दी जमली होती.
नड्डा यांनी आपल्या मनोगतात भगवान गणेशाचे आशीर्वाद देशाच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी लाभावेत, अशी प्रार्थना केली. त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करून हा उत्सव समाजजागृतीचा दीप प्रज्वलित करणारा असल्याचे सांगितले.
मुंबईत दौऱ्यावर असताना नड्डा यांनी राज्यसभा सदस्य व ‘पद्मश्री’ अॅड. उज्ज्वल निकम यांच्या निवासस्थानी विराजमान गणेशाचेही दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुढे त्यांनी मुंबईतील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात भेट देऊन देशाच्या प्रगती, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
दरम्यान, चंद्रलोक गणपती मंडळात नड्डा यांनी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे 125 वे थेट प्रक्षेपण ऐकले. मोदी यांनी देशातील क्रीडा प्रतिभा, वैज्ञानिक नवोपक्रम आणि स्वदेशी उत्पादनांचा वापर यावर मौलिक विचार व्यक्त करत नागरिकांना आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचे आवाहन केले. देशभरात होत असलेल्या विविध नवोपक्रमांना एकत्र आणून लोकांना प्रेरणा दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानले.
गणेशोत्सवाच्या शुभ प्रसंगी लालबागच्या राजाला केलेल्या दर्शनानंतर नड्डा यांनी सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर व्हावीत आणि सुख, सौभाग्य लाभावे अशी प्रार्थना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नड्डा यांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थितीबद्दल आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule