राष्ट्रीय पोषण सप्ताह : सुदृढ समाजासाठी आरोग्यदायी आहाराचे महत्त्व
आपल्या भारत देशात दरवर्षी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह’ साजरा केला जातो. हा केवळ एक सरकारी उपक्रम नसून, एक सामाजिक आंदोलन आहे. मानवी जीवनाचा आणि समाजाचा पाया हा योग्य पोषणावर अवलंबून असतो. पोषण म्हणजे केवळ पोट भरणे नव्ह
राष्ट्रीय पोषण सप्ताह


आपल्या भारत देशात दरवर्षी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह’ साजरा केला जातो. हा केवळ एक सरकारी उपक्रम नसून, एक सामाजिक आंदोलन आहे. मानवी जीवनाचा आणि समाजाचा पाया हा योग्य पोषणावर अवलंबून असतो. पोषण म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे, तर शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक घटक, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने योग्य प्रमाणात मिळणे होय. १९८२ साली भारत सरकारने या उपक्रमाची सुरुवात केली. त्यामागचा उद्देश केवळ लोकांना आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देणे एवढाच नाही तर समाजात पोषणाबाबत, आहाराबद्दल आणि आरोग्याबद्दल योग्य जागरूकता निर्माण करून कुपोषणमुक्त आणि सुदृढ भारत घडवणे हा आहे.

आजच्या धकाधकीच्या युगात, बदलत्या जीवनशैलीत आणि असंतुलित आहार पद्धतीत पोषण हा प्रश्न फक्त ग्रामीण किंवा आदिवासी भागापुरता मर्यादित न राहता शहरी जीवनातही तितकाच गंभीर झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पोषण सप्ताह हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता तो आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणारा महत्त्वपूर्ण सामाजिक चळवळ म्हणून पाहणे गरजेचे आहे. मानवी आयुष्यातील सर्व टप्प्यांत पोषण हा महत्वाचा पाया ठरतो. बालकाच्या वाढीमध्ये, किशोरवयीन मुलामुलींच्या शारीरिक व मानसिक विकासात, प्रजननक्षम वयातील महिलांच्या आरोग्यात आणि वृद्धापकाळातील रोगप्रतिकारशक्तीत पोषक आहाराची भूमिका अमूल्य असते. परंतु दुर्दैवाने भारतासारख्या विकसनशील देशात अजूनही कुपोषण ही मोठी समस्या आहे.

पोषण किंवा संतुलित आहार म्हणजे नेमके काय? तर केवळ भूक भागवणे किंवा पोट भरणे म्हणजे पोषण नव्हे, तर शरीराला आवश्यक असणारे प्रमुख घटक जसे की प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे व पाणी यांचा संतुलित व योग्य प्रमाणात आहारात समावेश होणे आवश्यक आहे. प्रथिने शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. डाळी, दूध यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. कर्बोदके शरीराला ऊर्जा देतात. गहू, ज्वारी, बाजरी, भात आणि बटाटे हे कर्बोदकांचे मुख्य स्त्रोत आहेत. जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला विविध रोगांपासून वाचवतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. हिरव्या भाज्या, फळे, दूध आणि सूर्यप्रकाशातून मिळणारे 'ड' जीवनसत्व हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या पारंपरिक भारतीय आहारात या सर्व घटकांचा नैसर्गिक समावेश दिसून येतो. डाळी, कडधान्ये, भात, भाकरी, भाजीपाला, दूध, फळे, सुकामेवा, मसाल्यांचे योग्य संयोजन हे आरोग्यदायी आहाराचे उत्तम उदाहरण आहे.

मात्र आजच्या वेगवान जीवनात, आपण अनेकदा आरोग्याला दुय्यम स्थान देतो. झटपट तयार होणारे अन्न, फास्ट फूड, जंक फूड, गोड पेये, जास्त मीठ-तेल-साखर असलेला आहार आणि अयोग्य खाण्याच्या सवयींमुळे आपले आरोग्य धोक्यात आले असून जीवनशैलीजन्य रोग झपाट्याने वाढू लागले आहेत. यामुळे अनेक नवीन समस्या जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि लठ्ठपणा वाढत आहेत. विशेषतः तरुण पिढीमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. म्हणूनच, योग्य पोषण आणि संतुलित आहाराचे महत्त्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पारंपारिक भारतीय आहारात सर्व पोषक घटक असतात. आपल्या जेवणात भात, पोळी, डाळी, भाज्या, दही, ताक, सलाड आणि फळे यांचा समावेश असतो. पण, आधुनिकतेच्या नावाखाली आपण हा आहार सोडून पाश्चिमात्य आहार पद्धती स्वीकारत आहोत, ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत.

राष्ट्रीय पोषण सप्ताहात याच बाबीवर भर दिला जातो. संतुलित आहाराची सवय लहानपणापासूनच लावणे हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. शालेय पोषण आहार योजना, आंगणवाडीतील पूरक आहार, गर्भवती व स्तनदा महिलांसाठीचे पोषण कार्यक्रम हे उपक्रम त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेली ‘पोषण अभियान’ योजना ही राष्ट्रीय पोषण सप्ताहाला मिळालेली अधिक व्यापक दिशा आहे. या योजनेचा उद्देश २०२५ पर्यंत कुपोषण निर्मूलन साध्य करणे हा आहे. मुलांमध्ये स्टंटिंग, वेस्टिंग आणि अॅनिमिया कमी करण्यासाठी बहुआयामी प्रयत्न यातून सुरू आहेत. परंतु केवळ सरकारी योजना पुरेशा नाहीत, यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. कुटुंब हे पोषणाची पहिली शाळा असते. घरातील आहार पद्धतीत बदल करून आपण मोठी क्रांती घडवू शकतो. जेवणात ताज्या भाज्या, फळे, कमी तेल-मीठ-साखर यांचा समावेश, मुलांना पौष्टिक अन्न देणे, सण-उत्सवात पारंपरिक आरोग्यदायी पदार्थांना स्थान देणे या छोट्या वाटणाऱ्या कृतींचा मोठा परिणाम घडतो. ग्रामीण भागात उपलब्ध स्थानिक अन्नधान्य, भाज्या, फळे, कडधान्ये यांचा योग्य वापर करून खर्च कमी करतानाच पोषणमूल्य वाढवता येते.

पोषण हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही तर तो आर्थिक व सामाजिक विकासाशीही निगडित आहे. कुपोषण ही आपल्या देशासमोरील एक मोठी समस्या आहे. गरिबी, निरक्षरता, आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक मुले आणि स्त्रिया कुपोषणाचे बळी ठरतात. कुपोषणामुळे त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ खुंटते, आणि ते विविध आजारांना सहज बळी पडतात. कुपोषित पिढी कधीही सक्षम नागरिक होऊ शकत नाही. शारीरिक क्षमतेत कमतरता, मानसिक विकासात मागासलेपणा, कामकाजातील अकार्यक्षमता या सर्व गोष्टी थेट देशाच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम घडवतात. त्यामुळे पोषण हा राष्ट्रीय विकासाचा घटक आहे हे ओळखणे गरजेचे आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफसारख्या संस्था पोषणाकडे विकासाच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा आग्रह धरतात.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पोषणविषयक माहिती मिळवणे कठीण राहिलेले नाही. तरीसुद्धा चुकीच्या जाहिराती आणि डाएट्समुळे अनेक लोक गोंधळतात. उपासमारी आणि कुपोषण हा एक टोकाचा प्रश्न असताना दुसऱ्या टोकाला स्थूलतेची समस्या देखील गंभीर रूप धारण करत आहे. अनियमित जीवनशैली, फास्ट फूडचे अतिसेवन, आणि शारीरिक श्रमाचा अभाव यामुळे अनेक लोक स्थूल होत आहेत. स्थूलता केवळ शरीरावर परिणाम करत नाही, तर मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करते. स्थूलता टाळण्यासाठी, नियमित व्यायाम करणे आणि योग्य आहाराचे पालन करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. योगा, चालणे, धावणे किंवा कोणताही मैदानी खेळ नियमित खेळल्यास शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहतात. वजन कमी करण्याच्या अवास्तव धडपडीत शरीराला आवश्यक पोषक घटक न मिळाल्याने तरुण पिढी त्रस्त होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय आहारशैलीत बदल टाळावा. संतुलित आहारासोबत नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक ताणावर नियंत्रण हे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत.

राष्ट्रीय पोषण सप्ताह हा आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. आपण स्वतःचा आहार तपासावा, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आवश्यक पोषण मिळते का याचा विचार करावा आणि समाजात याबद्दल जनजागृती करावी. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, आरोग्य कर्मचारी, माध्यमे यांनी मिळून पोषणविषयक संदेश घरोघरी पोहोचवणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार हा खर्चिकच असतो हा गैरसमज दूर करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. एक सुदृढ, सक्षम आणि कुपोषणमुक्त भारत घडवण्यासाठी राष्ट्रीय पोषण सप्ताह हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तो केवळ एका आठवड्यापुरता न राहता आयुष्यभराची जीवनशैली ठरायला हवा. पोषण ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे, आरोग्य हा विकासाचा पाया आहे आणि सुदृढ नागरिक हेच समृद्ध राष्ट्राचे खरे भांडवल आहे. म्हणूनच प्रत्येकाने हा संदेश मनापासून आत्मसात करून आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी योगदान द्यावे, हीच राष्ट्रीय पोषण सप्ताहाची खरी सार्थकता आहे.

राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त, आपण सर्वांनी एक शपथ घ्यायला हवी की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ. आपल्या दैनंदिन आहारात स्थानिक आणि मोसमी फळे आणि भाज्यांचा समावेश करू. पाणी भरपूर पिऊ आणि पॅकेज्ड फूड व फास्ट फूड टाळू. आपल्या कुटुंबातील सदस्य, विशेषतः लहान मुलांना आणि ज्येष्ठांना योग्य पोषण मिळेल याची खात्री करू. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जर आपले शरीर आणि मन निरोगी असेल, तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. राष्ट्रीय पोषण सप्ताह आपल्याला आठवण करून देतो की पोषण ही केवळ एक गरज नसून, जीवनाचा अविभाज्य भाग आहे. चला, १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या आठवड्याच्या माध्यमातून आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी घेऊया. आपण सर्व एक निरोगी भारत घडवण्यासाठी आपले छोटेसे पाऊल उचलून एक मोठी क्रांती घडवू शकतो. सुदृढ शरीर आणि निरोगी मन असेल तरच आपण एक सशक्त आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करू शकतो.

- डॉ. राजेंद्र बगाटे, नाशिक

(लेखक, सहाय्यक प्राध्यापक असून समाजशास्त्र आणि वृध्दत्वशास्त्राचे अभ्यासक आहेत)

मो. क्र. ९९६०१०३५८२, ईमेल – bagate.rajendra4@gmail.com

--------

हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL


 rajesh pande