* अन्याय केला तर ओबीसींची वज्रमूठ पुन्हा बांधू!
* उद्यापासून राज्यभर ओबीसींची शांततामय मार्गाने तालुका आणि जिल्हास्तरावर उपोषणे आणि आंदोलने
मुंबई, १ सप्टेंबर (हिं.स.) : राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. मुंबईमध्ये मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन करत आहे. मात्र ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले, तर ओबीसीमधल्या लहान लहान जातीचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा असून ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध कायमच असेल, असे मत ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला, ओबीसी बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे, भटक्या विमुक्तांचे अभ्यासक लक्ष्मण गायकवाड, प्रा. लक्ष्मण हाके, तौलिक समाजाचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,ॲड.मंगेश ससाणे, बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.पी टी चव्हाण, कुणबी समाजाचे अध्यक्ष दशरथ पाटील,बापूसाहेब भुजबळ,कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतराव शितोळे यांच्यासह ओबीसी आणि भटक्या विमुक्तांमधील विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून ओबीसींच्या वाट्यामध्ये वाटेकरी नको असे आंदोलने करायची आहेत. काहीही झाले तरी ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये आम्ही वाटेकरी येऊ देणार नाही ही आपली भूमिका असली पाहिजे. या आंदोलनानंतर मोठ्या स्वरूपात आंदोलने करायची असल्यास ते देखील पुढे करू असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्यांना शक्य आहे अश्या लोकांनी साखळी उपोषण करावे. आणि आपल्यावर अन्याय झाला तर आपण देखील मुंबईत धडकू, असा इशारा त्यांनी दिला.
पुढे ते म्हणाले की, कुणबी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी आमची भूमिका आहे. जे कुणबी असतील त्यांना लाभ द्यावा मात्र सरसकट सर्वांनाच कुणबी म्हणून घ्यायला आमचा विरोध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी