नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मिजोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) आज, शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शनिवारी 14 सप्टेंबर रोजी मिजोरमच्या आयझोल येथे भेट देतील आणि 9 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ करतील. या वेळी ते एका सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांना संबोधित करतील.हे प्रकल्प प्रामुख्याने रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा अशा विविध क्षेत्रांशी संबंधित असून, मिजोरमच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे ठरणार आहेत. त्यानंतर ते मिझोरामहून मणिपूरच्या चुराचांदपूरला आणि नंतर इंम्फाल येथे जातील. चुराचांदपूरमध्ये पंतप्रधान 7300 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचा शिलान्यास करतील. त्याचबरोबर 1200 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटनही ते करतील. एकूण 8500 कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा अपेक्षित आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
मणिपूरचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी सांगितले की पंतप्रधानांचा दौरा मणिपूरच्या सर्वांगीण, समावेशक आणि शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या या भेटीदरम्यान ते चुराचांदपूर आणि इंफालमध्ये आंतरस्थळी विस्थापित नागरिकांशी संवाद साधतील. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इंफाळ आणि चुराचांदपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांनी किल्ल्याभोवती चौकशी आणि गस्त वाढवली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या नौका किल्ल्याभोवतीच्या खंदकांमध्ये गस्त घालत आहेत. 1891 पूर्वी, मणिपूरच्या राजांचा हा किल्ला सत्तेचे केंद्र होता. किल्ल्याभोवतीची खंदकं, पूर्वेकडील इंफाळ नदी, आणि आतील पोलो मैदान, जंगल, मंदिरे आणि पुरातत्व कार्यालयात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
हजारिकांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सहभाग
पंतप्रधान 14 सप्टेंबर रोजी आसामचा दौरा करतील. ते संध्याकाळी सुमारे 5 वाजता गुवाहाटी येथे भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्म शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या विशेष प्रसंगी ते जनसमुदायाला संबोधितही करतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी दरांग येथे विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करतील आणि सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांना संबोधित करतील. त्यानंतर दुपारी सुमारे 1.46 वाजता ते गोलाघाट येथील नुमालीगड रिफायनरी प्रकल्पात असलेल्या 'असम बायो-इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड' चा उद्घाटन सोहळा पार पाडतील. तसेच, तेथे पॉलीप्रोपायलीन प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभही करतील.
पश्चिम बंगाल आणि बिहारचाही दौरा
पूर्वोत्तर भारतानंतर पंतप्रधान सोमवारी 15 सप्टेंबरला पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे सकाळी 9.30 वाजता सोळाव्यासंयुक्त कमांडर्स परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते बिहारकडे प्रयाण करतील. बिहारमध्ये, दुपारी 2.45 वाजता पूर्णिया विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल. यासोबतच, ते सुमारे 36 हजार कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करतील आणि उपस्थित जनतेला संबोधित करतील. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये 'राष्ट्रीय मखाना बोर्डा'चा अधिकृत शुभारंभही करतील. त्याशिवाय, ‘डीएवाय-एनआरएलएम’ अंतर्गत कार्यरत क्लस्टर स्तरीय फेडरेशन्सना सुमारे 500 कोटींच्या समुदाय गुंतवणूक निधीचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात येईल. काही सीएलएफ अध्यक्षांना ते प्रत्यक्ष धनादेशही प्रदान करतील.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी