धाराशिव, 13 सप्टेंबर (हिं.स.) - मराठा समाजानंतर आता ओबीसी आणि त्यापाठोपाठ बंजारा समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. एकीकडे राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बंजारा समाजालाही हैद्राबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी धाराशिवच्या मुरूम गावातील पवन गोपीचंद चव्हाण या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. महत्वाचे म्हणजे त्याच्याकडे सुसाईड नोट देखील सापडली आहे. दरम्यान बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
पवनच्या आत्महत्येची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. यावेळी मयत पवनच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्यात त्याने, हैद्राबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यात यावे, अशा मागणीचे पत्रात लिहिले आहे. मयत पवन चव्हाण हा लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये बीकॉम पदवी शिक्षण घेतले असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बायको, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी पदवीधर बेरोजगार पवन चव्हाण (32) याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथून जवळच असलेल्या नाईक नगर येथे त्याने आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती मिळाली. पवनने जालन्यातील जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. तो दोन दिवस या आंदोलनात सहभागी झाला होता. कालच तो आपल्या गावी परतला होता. आल्यावर तो आपल्या मित्रांमध्ये आरक्षण विषयी जनजागृती करत होता. दरम्यान आज सकाळी उठून तो जिंतूर येते जाण्यासाठी तयारी करीत असतानाच अचानकपणे त्याने आपल्या राहत्या घरातील बांबूला गळफास घेत आत्महत्या केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी