नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) : सी.पी. राधाकृष्णन यांनी आज, शुक्रवारी देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांकडून शुभेच्छांचा स्वीकार करता सी.पी. राधाकृष्णन यांनी पदभार स्वीकारला.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी वैद्यकीय कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी या पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात अद्याप दोन वर्षांचा कालावधी शिल्लक होता. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. त्यांनी विरोधी इंडि आघाडीचे उमेदवार, माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांच्या फरकाने पराभव केला. राधाकृष्णन यांना एकूण 452 मते मिळाली, तर रेड्डींना 300 मतांवर समाधान मानावे लागले. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. यापूर्वी राधाकृष्णन यांनी झारखंड, तेलंगणा आणि पुदुचेरी या राज्यांमध्येही राज्यपाल वा उपराज्यपाल म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
राजकीय प्रवास आणि भूमिका
सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून घडला. ते दोन वेळा (1998 आणि 1999) कोयंबतूरमधून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी 2004, 2014 आणि 2019 मध्ये या मतदारसंघातून अपयश पाहिलं. ते 2004 ते 2007 दरम्यान तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. याच काळात त्यांनी 93 दिवसांत 19 हजार किमी लांबची रथयात्रा काढली. त्यांनी केरळ भाजपचे प्रभारी, कोयर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच युनायटेड नेशन्स महासभेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
राधाकृष्णन यांना तमिळनाडूमधील मजबूत संघटन कौशल्य, प्रशासनातील अनुभव, आणि जनसंपर्कातील कुशलता यांसाठी ओळखले जाते. त्यांच्या समर्थकांकडून त्यांना “तमिळनाडूचा मोदी” असेही संबोधले जाते.--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी