देशात मान्सूनची माघार १५ सप्टेंबरपासून; राज्यात परतीच्या पावसाचा जोर
मुंबई, 13 सप्टेंबर, (हिं.स.)। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी नैऋत्य मान्सूनचा माघारीचा प्रवास नेहमीपेक्षा पंधरा ते वीस दिवस आधी सुरू होणार असून, सोमवार १५ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून त्याची अधिकृत सुरुवात होणार आहे. साधारणपणे १७ सप्टेंबर
Monsoon withdraw  September 15


मुंबई, 13 सप्टेंबर, (हिं.स.)। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी नैऋत्य मान्सूनचा माघारीचा प्रवास नेहमीपेक्षा पंधरा ते वीस दिवस आधी सुरू होणार असून, सोमवार १५ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून त्याची अधिकृत सुरुवात होणार आहे. साधारणपणे १७ सप्टेंबरच्या सुमारास मान्सून वायव्य भारतातून परतण्यास सुरुवात करतो, तर १५ ऑक्टोबरपर्यंत तो संपूर्ण देशातून निघून जातो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये २४ मे रोजी (२००९ नंतर सर्वात लवकर) दाखल झाला होता आणि २९ जूनपर्यंत देशभर पसरला. त्यामुळे माघारही लवकर अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही परतीच्या पावसाची सुरुवात झाली असून परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे.

गेल्या साडेतीन महिन्यांत मान्सूनने देशभर भरभरून पाऊस पाडला. आतापर्यंत देशात ८३६.२ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त आहे. वायव्य भारतात ७२०.४ मिमी पाऊस नोंदवला गेला, जो सामान्यपेक्षा तब्बल ३४ टक्के अधिक आहे. हिमाचल प्रदेशात या हंगामात ९६७.२ मिमी पाऊस पडून मृतांचा आकडा ३८६ वर पोहोचला आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे गंगेची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा २३ सेंमीने वर असून, ८० गावे पुराच्या विळख्यात आली आहेत.

महाराष्ट्रात परतीच्या पावसाची सुरुवात झाली असून, शुक्रवारी अनेक भागांत पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्र–दक्षिण मध्य महाराष्ट्रातील द्रोणीय स्थितीमुळे राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने लातूर, नांदेड, सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर पुणे घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरी येथे सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तथापि, मान्सून परतल्यानंतरही पावसाची मालिका थांबणार नाही, तर तो अवकाळी स्वरूपात अधूनमधून सुरू राहील, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. सप्टेंबरच्या अखेरीस वातावरणातील उष्मा वाढून ‘ऑक्टोबर हीट’ जाणवण्याची शक्यता असून, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण वाढू शकते. गेल्या काही वर्षांत मान्सूनच्या माघारीची तारीख १५ सप्टेंबरवरून पुढे ढकलली जात ६ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होत होती, परंतु यंदा मान्सून लवकर आल्याने परतही लवकर जाणार आहे. राज्यातील धरणे तुडुंब भरल्याने पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असली, तरी परतीच्या पावसामुळे ग्रामीण भागातील काही ठिकाणी पुराचा धोका कायम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande