इंम्फाल/आइजॉल, 13 सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी मिझोरम आणि मणिपूर राज्यांना हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त नागरिकांची भेट घेतली आणि प्रदेशातील शांतता, समावेश आणि विकासासाठी सरकारच्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती केली.
मणिपूरच्या चुराचांदपुर येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 7 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. हे प्रकल्प मुख्यतः डोंगरी भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणतील, असे त्यांनी नमूद केले. यावेळी मोदी म्हणाले की, मणिपूरची ही भूमी साहस आणि हिंमतीची आहे. येथील डोंगर आणि निसर्ग हे केवळ सौंदर्याचे नव्हे, तर येथील लोकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेही प्रतीक आहेत. त्यांनी मणिपूरला मणि म्हणजेच उत्तरपूर्व भारताच्या उज्ज्वल भविष्यातील तेजस्वी रत्न असे संबोधले. मोदींनी नमूद केले की, मागील काही वर्षांमध्ये मणिपूरमध्ये जलसंपदा, रस्ते आणि रेल्वे क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. त्यांनी झिरीबाम-इम्फाळ रेल्वे मार्गाच्या लवकरच राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडल्या जाण्याचे संकेत दिले.
राज्यातील दीर्घकालीन हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी शिविरांमध्ये राहत असलेल्या पीडितांशी संवाद साधला आणि शांततेच्या दिशेने सुरू असलेल्या संवाद प्रक्रियेवर समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, संवाद, परस्पर सन्मान आणि समजुतीच्या आधारे शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे.“मणिपूर ही आशा आणि विश्वासाची भूमी आहे. जरी हिंसाचाराने या प्रदेशाला काही काळ अस्थिर केलं, तरी आता विश्वास आणि विकासाच्या नव्या पहाटेची सुरुवात होत आहे,” असे त्यांनी सांगितले.मोदींनी हेही सांगितले की गेल्या 11 वर्षांत भारत सरकारने पूर्वोत्तरमधील अनेक दशकांपासून चालू असलेल्या संघर्षांचा शेवट करण्यासाठी प्रयत्नशील राहून अनेक ऐतिहासिक करार केले आहेत. त्यांनी सर्व गटांना शांततेच्या मार्गावर चालण्याचे आणि विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी