अकोला, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। अकोल्यातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. प्राथमिक तपासात किरकोळ वादातून घडलेले हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात शांताराम शिवराम गोपनारायण (रा. घुसर) यांचा जागीच मृत्यू झाला असून आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे.
सर्वोपचार रुग्णालय परिसरात दररोज अनेक भटकंती लोक रात्री झोपण्यासाठी आश्रय घेतात. सोमवारी रात्री अशाच दोन बेघर व्यक्तींमध्ये जागेवरून वाद झाला. दारूच्या नशेत वाद चिघळल्याने आरोपीने दगडाने वार करून शांताराम यांचा खून केला. या घटनेत मारेकरी रवी फिरनापुरे देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुद्ध आल्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
घटनास्थळापासून केवळ २० मीटर अंतरावर MEESCO सुरक्षा रक्षकांची चौकी असूनही आवाज ऐकू न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सरकारी पंच अनुपलब्ध असल्याने प्रत्यक्ष पंचनामा सकाळी दहानंतरच सुरू झाला.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शिरीष खंडारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, बाहेरील व्यक्तींना प्रवेश थांबविण्याची मागणी घटनास्थळी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे