लातूर, 18 सप्टेंबर, (हिं.स.) - गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा सकल महादेव कोळी समाज बांधवांनी पुकारलेले आमरण उपोषण जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले. यावेळी माजी मंत्रीआमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार संजय बनसोडे उपस्थित होते.समाज बांधवांच्या सर्व मागण्या मान्य करत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून लगेच सर्व गोष्टी लागू करू, असे वचन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावर समाज बांधवांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत उपोषण मागे घेतले.
मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यात अनेक अडचणी येत असल्याची तक्रार त्यांनी केली. मराठवाड्यात जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेगळे निकष असल्याची समस्या त्यांनी मंत्री महोदयांसमोर मांडली. तसेच समाजाच्या समस्या सुटाव्यात यासाठी एक समाज बांधवाने आत्महत्या केल्याची दुःखद घटना देखील त्यांनी सांगितली. यावर मुख्यमंत्र्यांची चर्चा करून तत्काळ मार्ग काढू व उर्वरीत महाराष्ट्रात जात प्रमाणपत्रासाठी जे निकष आहेत, तेच मराठवाड्यात देखील लागू करू, असा विश्वास दिला. याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देखील पूर्ण मदत करू, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis