अतिवृष्टी झालेल्या ठिकाणचे प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा - जयकुमार गोरे
सोलापूर, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून,91महसुली मंडळापैकी43महसुली मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. तसेच उजनी व सीना नदी मधून पाणी सोडल्याने अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पि
अतिवृष्टी झालेल्या ठिकाणचे प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा - जयकुमार गोरे


सोलापूर, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून,91महसुली मंडळापैकी43महसुली मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. तसेच उजनी व सीना नदी मधून पाणी सोडल्याने अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे,घरांचे तसेच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचेही नुकसान झालेले आहे. तरी प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे अत्यंत गतिमान पद्धतीने तसेच65मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला ठिकाणचे100टक्के पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा,असे निर्देश राज्याचे ग्राम विकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. गोरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार,महापालिका आयुक्त सचिन ओंबासे,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील कुंभार,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सकृत खांडेकर,यांच्यासह प्रांताधिकारी व सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की,जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. प्रशासकीय यंत्रणेने त्वरित पंचनामे करावेत. एकही शेतकरी व नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी65मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे,अशा ठिकाणचे सरसकट पंचनामे करावेत,यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड चालणार नाही. अशा ठिकाणचे पंचनामे राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रांताधिकारी यांची राहील,असेही त्यांनी निर्देशित केले.

तसेच पंचनामे करत असताना शेतकऱ्यांची पुन्हा ई केवायसी करण्याची आवश्यकता नाही,यापूर्वीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी तसेच अन्य शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे ई- केवायसी झालेली आहे. त्याच बँक खात्यावर शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाईची रक्कम मिळेल यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी दक्षता घ्यावी. ई -केवायसी अभावी पंचनामेचा अहवाल पाठवण्यास दिरंगाई करू नये,असे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सुचित केले. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यांनी त्यांच्या अधिनस्त रस्त्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. यंत्रणांनी जे शक्य आहे ते लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना शासनाकडून लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत,असेही त्यांनी सुचित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande