अमरावती, 19 सप्टेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून घोषित केलेल्या जीएसटी कर दर पुनर्रचनेचा लाभ आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. नव्या कर रचनेमुळे सामान्य माणसाच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून येतील, असा विश्वास भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आज अमरावती श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉ नितीन धांडे, प्रदेश सचिव जयंत डेहणकर, किरण पातूरकर, किरणताई महल्ले, चेतन पवार, राधाताई कुरील, बादल कुळकर्णी, ललित समदूरकर, राजू कुरील प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र सरकारने जीएसटीची रचना सुसूत्र करून चार स्तरांऐवजी केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच दर ठेवले आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा कमी होणार असून, सामान्य माणसाच्या खिशाला दिलासा मिळणार आहे. ही सुधारणा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरेल आणि व्यापार क्षेत्रासाठीही मोठी संधी निर्माण करेल, असे कुळकर्णी म्हणाले.
शेतकरी, महिला, युवा वर्ग, लघु व मध्यम उद्योगांना नव्या धोरणाचा लाभ मिळेल. रोजगाराच्या संधी वाढून कुटुंबांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. २०१४ पूर्वीच्या संथ आर्थिक प्रगतीनंतर मोदी सरकारने पारदर्शकता व सुलभ करप्रणालीचा अवलंब करून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने निर्णायक पावले उचलली आहेत, असे त्यांनी सांगितले. जीएसटी परिषदेने एकमताने या सुधारणा स्वीकारून पंतप्रधानांच्या संकल्पाला बळ दिले आहे. काँग्रेसच्या टीकेकडे दुर्लक्ष करून मोदी सरकार विकासाचेच राजकारण करत राहील, असेही कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी