पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.)। पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोजणीपूर्वी भूसंपादनास सात गावांतील ९० टक्के जागा मालकांनी संमतिपत्रे सादर केली आहेत. गुरुवारी अखेरच्या दिवसांपर्यंत भूसंपादन करण्यात येणाऱ्या एकूण तीन हजार एकर क्षेत्रापैकी दोन हजार ७०० एकर जमिनींची संमतिपत्रे प्रशासनाकडे दाखल झाली आहेत. प्रथमच प्रकल्पासाठी भूसंपादन करताना अशा पद्धतीने संमतिपत्रे घेण्याचा ‘पुणे पॅटर्न’ या निमित्ताने सुरू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र दोन हजार ६७३ (सुमारे सात हजार एकर) इतके होते. आता त्यात एक हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र एक हजार २८५ हेक्टर (तीन हजार एकर) करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु