
राज्यातील ४३५, नाशिकच्या ५० खेळाडूंचा सहभाग
नाशिक, 10 जानेवारी (हिं.स.)।
नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या परवानगीने आणि मार्गदर्शनाखाली नाशिक येथे उद्या दिनांक ११ जानेवारी ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान ३५ वर्षे आणि त्यावरील वयोगट अश्या विविध नऊ वयोगटाच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले. या स्पर्धाचे आयोजन नाशिकच्या गंगापूर रोड येथील केन्सिंगटन क्लब येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये ३५ वर्षावरील गट, ४० वर्षे. ४५ वर्षे, ५० वर्षे, ६० वर्षे, ६५ वर्षे, ७० वर्षे आणि ७५ वषर्षावरील गट अश्या पुरुष आणि महिलांच्या नऊ गटामध्ये स्पर्धा रंगणार आहे. एकेरी (सिंगल्स), दुहेरी (डबल्स) आणि मिश्र दुहेरी (मिक्स डबल्स) या तीन प्रकारात स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.
दिनांक ११ ते १३ जानेवारी दरम्यान ५५ वर्षे वरील ते ७५ वर्षावरील गट यांच्या स्पर्धा खेळविल्या जातील, तर दिनांक १३ ते १५ जानेवारी दरम्यान ३५ वर्षे ते ५० वर्षे वरील गटांच्या स्पर्धा खेळविल्या जातील.
या स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या अधिकृत नियमावलीनुसार खेळविल्या जाणार आहेत.
या स्पर्धा योनेक्स सनराईस यांनी पुरस्कृत केल्या आहेत.
या स्पर्धाच्या सूत्रबद्ध आयोजनासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लाखनी, कार्याध्यक्ष शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष मंगेश काशीकर, राज्य सचिव सिद्धार्थ पाटील आदी परिश्रम घेत आहेत.
तरी या स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी नाशिकच्या क्रीडा प्रेमी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV