
सोलापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
करमाळा येथे एका पित्यानेच आपल्या जुळ्या मुलांना विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. शिवांश सुहास जाधव व श्रेया सुहास जाधव (वय ८) अशी मृत मुलांची नावे आहेत. वडिलांना पोलिसांनी पकडताच विष प्राशन केल्याचे सांगितले.
घटनेनंतर संशयित आरोपी सुहास जाधव (वय ३२) याने आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर तो फरार झाला होता. त्याने फोनवरून एका जवळच्या व्यक्तीस आपल्या कृत्याची माहिती दिली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी संशयिताचा शोध सुरू केला. पोलिसांनी सुहास जाधव याला टेंभुर्णी येथे ताब्यात घेतले.
अटकेनंतर त्याने आपण विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमागील कारणांबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून, करमाळा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड