


रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत रंगभूमीची परंपरा जपण्यासाठी गेली २८ वर्षे कार्यरत असलेल्या रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेच्या सहकार्याने एन.सी.पी.ए. मुंबई व त्यांच्या सीएसआर पार्टनर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत तीन दिवसांचा संगीत नाट्य महोत्सव उत्साहात झाला.
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या या महोत्सवात संगीत संशयकल्लोळ, संगीत शांतिब्रह्म आणि संगीत प्रीतीसंगम या तीन अजरामर संगीत नाटकांचे सादरीकरण झाले. संगीत नाट्याच्या सुरेल मेजवानीने नववर्षाची सुरवात झाल्याने रसिकांनी समाधान व्यक्त केले.
महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार व कादंबरीकार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या शुभहस्ते नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक संघाचे कार्यवाह राजन पटवर्धन, प्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर उपस्थित होते. उद्योजक दीपकशेठ गद्रे यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. डॉ. जोशी यांनी खल्वायनच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
पहिल्या दिवशी ५३ व्या राज्य नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवलेल्या संगीत संशयकल्लोळ या नाटकाने रसिकांना खळखळून हसवले. नवरा बायकोच्या संशयी आचरटपणावर बेतलेले हे धमाल विनोदी नाटक आहे. १९१६ साली पहिला प्रयोग पुण्यात झालेले हे नाटक ११० वर्षे होऊनही रसिकांना पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते.
दुसऱ्या दिवशी संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर आधारित, पुरस्कारप्राप्त संगीत शांतिब्रह्म या नाटकाचे प्रभावी सादरीकरण झाले. नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले व ४२ व्या राज्य नाट्य महोत्सवात १० वैयक्तिक पारितोषिकांसह प्रथम क्रमांक आणि नवी दिल्ली येथे द्वितीय क्रमांकप्राप्त या नाटकाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर आधारित हे नाटक होते. देखणे नेपथ्य, आशयघन कथानक, बहारदार गायकी असलेल्या नव्या चालीतील भारूड, अभंग, गवळण, या गायनप्रकारातील कर्णमधुर नाट्यपदांनी हे नाटक रंगतदार झाले.
तिसऱ्या दिवशी संत सखूच्या जीवनावर आधारित कै. प्र. के. अत्रे लिखित संगीत प्रीतिसंगम या नाटकाने महोत्सवाची सांगता झाली. ट्रिकसीनने नटलेले बहारदार नाटक, ज्येष्ठ कलावंतांचा कसदार अभिनय, तरुण तडफदार कलावंतांच्या गायकीतून सादर होणारी तू सुंदर चाफेकळी, आज आपुल्या प्रथम प्रीतीचा, कृष्ण माझी माता, देह देवाचे मंदिर, किती पांडुरंगा वाहू या सुमधूर पदांनी हे नाटक अधिक आकर्षक झाले.
तिन्ही नाटकांचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले. रत्नागिरी, चिपळूण व देवगड परिसरातील कलाकारांच्या सहभागामुळे महोत्सव अधिक रंगतदार झाला. सुमारे ५०० रसिकांनी या संगीत नाट्य मेजवानीचा आस्वाद घेतला असून, दरवर्षी असा महोत्सव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी