नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली; भाजपच्या विजयाचा विश्वास
नागपूर, 13 जानेवारी (हिं.स.) : महापालिका निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात भव्य बाईक रॅली काढत थेट नागरिकांशी संवाद साधला. भारत माता चौकातून सुरू झालेल्या या
नागपुरातील बाईक रॅलीत सहभागी होताना मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे


नागपूर, 13 जानेवारी (हिं.स.) : महापालिका निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात भव्य बाईक रॅली काढत थेट नागरिकांशी संवाद साधला. भारत माता चौकातून सुरू झालेल्या या रॅलीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष देशमुख, आमदार कृपाल तुमाने यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बाईक चालवताना मुख्यमंत्र्यांनी, “खूप दिवसांनी दुचाकी चालवत असल्याने थोडे असहज वाटत आहे,” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. मात्र नागरिकांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागतामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. प्रत्येक चौकात फुलांची उधळण, ढोल-ताशे आणि ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नागपुरातील शहीद चौक, बडकस चौक मार्गे ही रॅली महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. येथे रॅलीचा समारोप करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “नागपूर शहरात गेल्या अनेक वर्षांत केवळ भाजपनेच सातत्यपूर्ण विकास केला आहे. यावेळी नागपूरकर भरघोस मतदान करून मागील सर्व विक्रम मोडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांवर टीका करत त्यांनी नागपूरच्या विकासाची जबाबदारी पुन्हा भाजपलाच देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, आज, मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार सकाळपासून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसून आले. नागपूर महानगरपालिकेच्या 38 प्रभागांतील 151 नगरसेवक पदांसाठी तब्बल 993 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या अकरा दिवसांत भाजप, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, आप, मनसे तसेच अपक्ष उमेदवारांनी सभा, रॅली, पदयात्रांच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला. नागपूर महापालिकेवर गेल्या 19 वर्षांपासून भाजपची सत्ता असून, मागील निवडणुकीत भाजपने 151 पैकी 108 जागांवर विजय मिळवला होता. यंदा भाजपने 120 जागांचे लक्ष्य ठेवले असून, मुख्यमंत्र्यांची ही बाईक रॅली सुमारे 26 जागांवर प्रभाव टाकू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

रॅलीनंतर महाल परिसरातील शिवाजी चौकात मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या रोड शोला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता कोणतीही चिंता नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महानगरपालिकेत भाजप मागील विक्रम मोडून पुन्हा सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रचाराची मुदत संपत असताना भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत निवडणूक रणधुमाळीचा शेवट केला असून, आता सर्वांचे लक्ष मतदान आणि निकालाकडे लागले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande