
मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकांसह आजपासून संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांमधील एकूण 731 जागांसाठी तसेच संबंधित 125 पंचायत समित्यांमधील 1,462 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. संबंधित क्षेत्रात ही आचारसंहिता लागू झाली असली तरी अन्य ठिकाणीदेखील संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही; परंतु नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल.
जिल्हाधिकारी 16 जानेवारी 2026 रोजी निवडणुकीच्या सूचनेची प्रसिद्धी करतील. नामनिर्देशनपत्रे 16 ते 21 जानेवारीदरम्यान स्वीकारली जातील, तर छाननी 22 जानेवारीला होईल. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी असून त्यादिवशीच चिन्हवाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल.
या निवडणुकांसाठी सुमारे 25 हजार 482 मतदान केंद्रांची व्यवस्था केली असून ईव्हीएम यंत्रांची पुरेशी उपलब्धता करण्यात आली आहे. मतदारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर मतदान करावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व गरोदर महिलांसाठी विशेष सुविधा आणि प्राधान्य मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘मताधिकार’ मोबाईल अॅप आणि विशेष संकेतस्थळाद्वारे मतदार यादीत नाव व मतदान केंद्राची माहिती मिळू शकते.
प्रचाराची समाप्ती 3 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्रीपासून लागू होणार असून त्यानंतर कोणत्याही माध्यमातून प्रचारजाहिरातींना बंदी असेल. निवडणूक खर्चाची मर्यादा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक होण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, सुरक्षा आणि माध्यम संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा पुढील प्रमाणे असेल: 71 ते 75 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 9 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 6 लाख रुपये खर्च मर्यादा असेल. 61 ते 70 निवडणूक विभाग असेल्या जिल्हा परिषदांसाठी 7 लाख 50 हजार आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 5 लाख 25 हजार रुपये खर्च मर्यादा असेल. 50 ते 60 निवडणूक विभाग असेल्या जिल्हा परिषदांसाठी 6 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 4 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule