
अकोला, 14 जानेवारी (हिं.स.)महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान विविध कारणांमुळे पक्षातून बाहेर पडलेले किंवा काढण्यात आलेले अनेक नेते व कार्यकर्ते पुन्हा पक्षात दाखल होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक पक्षांनी नाराज कार्यकर्त्यांची तसेच पक्षविरोधी भूमिका घेतलेल्यांची घरवापसी करून संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.दरम्यान, अकोला लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. या निकालानंतर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या एका नेत्याच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिसरात प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षेपेक्षा कमी मते का मिळाली, याबाबत जाब विचारला होता.या घटनेनंतर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत जीवन डिगे यांच्यासह सात जणांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र आता महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी पत्रकाद्वारे या सातही कार्यकर्त्यांचे निलंबन मागे घेतले आहे.या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीत पुन्हा एकदा संघटनात्मक एकजूट दिसून येत असून, याचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे