
नागपूर, 14 जानेवारी (हिं.स.) : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या आहेत. उद्या गुरुवारी (15 जानेवारी) सकाळी 7:30 वाजल्यापासून शहरात मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे.
नागपूर शहरात एकूण 38 प्रभाग असून त्यापैकी 37 प्रभाग 4 सदस्यीय, तर एक प्रभाग 3 सदस्यीय आहे. नागपूरकरांना एकूण 151 नगरसेवकांची निवड करायची आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शहरात सुमारे 16 हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 5 हजार पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असणार आहेत.महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात एकूण 24 लाख 83 हजार 112 मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये 12 लाख 26 हजार 690 पुरुष मतदार, 12 लाख 56 हजार 166 महिला मतदार तसेच 256 इतर मतदारांचा समावेश आहे.मतदान प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी शहरात एकूण 3004 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी 321 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या केंद्रांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.
महिला मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येक झोनमध्ये एक मतदान केंद्र पूर्णतः महिला कर्मचाऱ्यांमार्फत चालवण्यात येणार असून या केंद्रांना ‘पिंक बुथ’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक झोनमध्ये एक ‘आदर्श बुथ’ तयार करण्यात आला असून तेथे मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा, तर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच शहरात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि सर्व मतदारांना सुरक्षित व सुलभ मतदान करता यावे, यासाठी प्रशासनाकडून सर्वसमावेशक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis