अकोट नगरपरिषदेत भाजप–एमआयएम युतीचा ‘दुसरा अंक’ यशस्वी
अकोला, १४ जानेवारी (हिं.स.)अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप–एमआयएम युतीचा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीच्या माध्यमातून युतीचा ‘दुसरा अंक’ यशस्वी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वीकृत नगरसेवक पदा
P


अकोला, १४ जानेवारी (हिं.स.)अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप–एमआयएम युतीचा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीच्या माध्यमातून युतीचा ‘दुसरा अंक’ यशस्वी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून भाजपाचे जिल्हा सदस्य व माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे सुपुत्र जितेन बरेठिया यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत जितेन बरेठिया यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.या निर्णयामुळे एमआयएममधील काही नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गट स्थापन करताना स्वीकृत गैर-मुस्लिम उमेदवार न घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते पाळलं गेलं नाही, असा आरोप करत एका नगरसेविकेच्या पतीने थेट पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जितेन बरेठिया यांचा भाजपाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत या प्रकरणापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्यक्षात एमआयएमच्या गटाकडूनच त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याने अकोट नगरपरिषदेत भाजप–एमआयएम युतीचा दुसरा टप्पा यशस्वी ठरल्याची चर्चा सुरू आहे.या प्रकरणात एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराला मदत केल्याचा ठपका ठेवत त्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले. ही कृती पक्षविरोधी असल्याचं सांगत एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी पत्राद्वारे नोटीस बजावली आहे. तसेच संभाव्य स्वीकृत नगरसेवक उमेदवार ताज राणा यांनी व्हिडिओद्वारे या पाच नगरसेवकांवर विश्वासघाताचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

या सर्व घडामोडींवर अखेर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी जाहीर भाषणात संबंधित पाचही नगरसेवकांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप अधिकृत पत्राद्वारे ही कारवाई करण्यात आलेली नाही.स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीमुळे भाजप–एमआयएम युतीचा दुसरा टप्पा यशस्वी ठरला असला, तरी या निर्णयामुळे एमआयएममध्येच नाराजी, राजीनामे, नोटिसा आणि थेट निष्कासनाची घोषणा झाल्याने अकोटच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande