
अकोला, 15 जानेवारी, (हिं.स.)। अकोला शहरातील नेहरू पार्क चौक परिसरात आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेधुंद दारूच्या नशेत ऑटो रिक्षा चालवणाऱ्या चालकाला दबंग महिला ट्राफिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा अपघात टळला आहे. अकोला शहरातील मुख्य मार्गावरून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनकडे जात असताना महिला ट्राफिक पोलीस अंजू भटकर यांना एका ऑटो रिक्षा चालकावर संशय आला. संशय बळावल्याने त्यांनी नेहरू पार्क चौकात सदर ऑटो रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र ऑटो चालक ऑटोमधून खाली उतरायला तयार नव्हता. घटनास्थळावरून पळून जाण्याच्या उद्देशाने त्याने ऑटो रिव्हर्स घेत मागे उभ्या असलेल्या एका कारला धडक दिली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच महिला ट्राफिक पोलीस अंजू भटकर यांनी धाडस दाखवत जबरदस्तीने ऑटो चालकाला बाहेर काढले. चालकाची चौकशी केली असता तो इतक्या तीव्र दारूच्या नशेत होता की तो आपले नावसुद्धा सांगण्याच्या स्थितीत नव्हता. मोठा अपघात होऊ नये आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी महिला ट्राफिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ऑटो चालकाला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, आज निवडणूक मतदानाचा दिवस असताना सुद्धा संबंधित चालकाला दारू कुठून मिळाली, हा प्रश्न आता नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. निवडणूक काळात दारूबंदी असताना हा प्रकार प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरत आहे.
या घटनेमुळे महिला ट्राफिक पोलिसांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे, तर दुसरीकडे दारू विक्रीवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे